PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या

| बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी याआधी जाहीर केलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार OBC ना देखील आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने जाहीर होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसुरून  राज्य निवडणूक आयोगाने दि.२२/०७/२०२२ रोजी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी जागा राखून ठेवणे बाबत आदेशित केलेले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे सदर आरक्षण दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील. दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने
जाहीर होणार आहे.

त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) यांचेकरिता जागा आरक्षित करण्यासाठी शुक्रवार, दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे आरक्षण सोडत आयोजीत करण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या एकूण ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय असून एक प्रभाग क्र. १. हा द्विसदस्यीय आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण जागा 173 आहेत. यातील 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 86 या सर्वसाधारण आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 23 आहेत. त्यातील 12 जागा महिलांसाठी तर 11 जागा सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारण 1 जागा आहे. OBC साठी 46 जागा आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 23 आरक्षित आहेत तर उर्वरित 23 या सर्वसाधारण आहेत. तर सर्वसाधारण या 102 जागा आहेत. त्यामध्ये 51 महिलांसाठी आरक्षित आहेत तर 51 या सर्वसाधारण साठी आहेत.