Property Tax | PMC | पहिल्या दोन महिन्यांत 751 कोटी मिळकतकर जमा  : मागील वर्षी पेक्षा 190 कोटींनी अधिक 

Categories
Breaking News PMC पुणे

पहिल्या दोन महिन्यांत 751 कोटी मिळकतकर जमा

: मागील वर्षी पेक्षा 190 कोटींनी अधिक

पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागास आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच 1 एप्रिल ते 27 मे या कालावधीत तब्बल 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 190 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत 560कोटी 34 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. अशी माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकरातील सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी 31 मे ही मुदत निश्‍चित करण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकर या दोन महिन्यांत कर भरतात. दरम्यान, यंदा दि. 1 एप्रिलपासून सुमारे 4 लाख 92 हजार 752 मिळकतकरधारकांनी कर जमा केला आहे. तर या मिळकतधारकांना 5 ते 10 टक्केच्या सवलतीपोटी महापालिकेने सुमारे 16 कोटींचा 60 लाखांचा  कर माफ केला आहे. या कर संकलनात सर्वाधिक 466 कोटींचा कर ऑनलाइन जमा करण्यात आला असून, सुमारे 70 कोटींची रक्कम रोख भरण्यात आली आहे. तर धनादेशाद्वारे 214 कोटींचा महसूल जमा करण्यात आला आहे.

 

महापालिकेच्या मिळकतकर सवलतीत भरण्यासाठी पालिकेकडून 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मुदतीत कर भरावा. शनिवारी आणि रविवारीही सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी महापालिकेची नागरी सुविधा केंद्र सुरू असतील. असे अजित देशमुख यांनी आवाहन केले आहे.