Dr Tessie Thomas | लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

पुणे : थोर स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर विचारावरच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया रचला गेला आहे. उद्याच्या बलाढ्य देशासाठी जे संशोधन सुरू आहे. त्यासही लोकमान्यांच्या विचारांचीच
प्रेरणा आहे. असे प्रतिपादन मिसाइल वुमन’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका डॉ. टेसी थॉमस यांनी सोमवारी केले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक- मोेेने आदी उपस्थित होेते.

डॉ. थॉमस म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून क्षेपणास्त्रात भारताला आत्मनिर्भर करण्याची आम्हाला
प्रेरणा मिळेल. या आनंददायी क्षणी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार असून तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या घोषणेची आठवण होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये लोकमान्यांचा स्वदेशीचा विचार क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये संशोधनासाठी महत्वाचा आहे. देश जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र तयार करत आहे. त्यात स्वदेशीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे थॉमस यांनी सांगितले.

भारतीय संशोधन आणि विकास संस्थेमध्ये  (डीआरडीओ) मी 1980 मध्ये वैज्ञानिक म्हणून दाखल झाले. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मला प्रथम अग्नी प्रकल्पामध्ये संशोधनाची संधी दिली. यावेळी लांब
पल्ल्याच्या स्वदेशी क्षेपत्रणास्त्राचे तंत्रज्ञान फारसे विकसीत झाले नव्हते. देशामध्ये यासंदर्भातील पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाविषयी फारसे संशोधन झाले नव्हते. देशात या संदर्भातील
एकही संस्था अथवा कंपनी पायाभुत सुविधा तयार करत नव्हते. मात्र कलाम हे डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी पुढील 30 वर्षांचे स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे स्वप्न पाहिले. त्यामुळेच आपण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या
क्षेपणास्त्राचे संशोधन करु शकलो. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे योगदान देत आहे. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर 4
हजार, 5 हजार ते 8 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ मिळत आहे. डीआरडीओमध्ये सध्या स्वदेशी बनावटीचे लढावू विमान,
एचसीएलसाठी विमाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्काराला लवकरच अत्याधुनिक मानवविरहित युध्द वाहने पुरवण्यात येणार आहेत. डीआरडीओत काम करत असताना मला सहकार्य करणारा
संघ व आईवडीलांचे यानिमित्ताने डॉ. थॉमस यांनी आभार मानले.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र काम करीत आहेत. देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांचा सत्कार म्हणजे
देशाचा सन्मान आज करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. संरक्षण क्षेत्रात डॉ. थॉमस यांनी प्रगतिपथावर नेले आहे. सध्या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू असले तरी शास्त्रज्ञ संरक्षणाच्या कामासाठी रात्रंदिवस काम करीत, नवनवीन शोध लावून देश बळकट करीत असल्याचे यावेळी शास्त्रज्ञांच्या कामाचे कौतुक यावेळी त्यांनी केले. संरक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञ पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारे येतात, जातात; पण शास्त्रज्ञांचे यज्ञ कधीच थांबत नाहीत. त्यांचे संशोधन सुरुच असते. कोणत्याही सत्तेत असणार्‍या सरकारने शास्त्रज्ञांच्या कामाचे श्रेय घेऊ नये, असेही यावेळी नमूद केले. संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञांचे काम अमूल्य असून त्यांनी देशाला मोठी उंची गाठून दिली आहे. ज्या ठिकाणी टाचणी तयार होत नव्हती त्या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी अग्नी क्षेपणास्त्राचा शोध लावला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची उंची वाढवणारे काम टिळक स्मारक ट्रस्टने केले असून शास्त्रज्ञांच्या कामाची पूजा बांधली असल्याचे यावेळी शिंदे यांनी कौतुक केले.

लोकमान्यांच्या चतू:सूत्रीमुळे देशात परिवर्तन : चंद्रकांत पाटील

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य चतूःसूत्री मांडून देशात परिवर्तन घडवून आणले. सर्वसामान्य माणसाला त्यांनी जोडले. शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे राष्ट्रीय शिक्षण हे सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण म्हणून घेण्यात आले आहे. लोकमान्यांनी त्यांच्या चतुःसूत्रीतून देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सध्या स्वदेशी हा त्यांचा मूलमंत्र सध्या आत्मनिर्भर भारत म्हणून आपण काम करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या भारतीय बनावटीचे साहित्य, संशोधनाचे साहित्य देशातच होत असून हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनेच काम होत आहे. आत्मनिर्भर भारत हेच त्यांचे प्रतीक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. देशाला प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी दिशा देणारे विचार लोकमान्यांनी चिंतन, मनन करुन मांडले आहेत. आजही ते विचार देशाला पुढे नेणारे
असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकमान्यांच्या विचारात आधुनिक भारताचा पाया

पुणे : लोकमान्यांची कोणतीच मांडणी भावनिक नव्हती. त्यांच्या मांडणीमागे प्रचंड अभ्यास आणि विचारांचे अधिष्ठान होते. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास करून लोकमान्यांनी आधुनिक भारताचा आराखडा मांडला. लोकमान्यांनी तेव्हा मांडलेले विचार आजही उपयुक्त ठरत आहेत. म्हणून लोकमान्यांच्या विचारातच आधुनिक भारताचा पाया घातला गेला. लोकमान्य वंदनीयपेक्षा आचरणीय अधिक आहेत. त्यांचे आयुष्य त्यागाने भरलेले आहे. त्यांचे वास्तववादी विचार आजही उपयुक्त ठरतात. स्वराज्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले असल्याचे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले.

Lokmanya Tilak National Award | डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-4 व 5’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्‍या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल. त्या दिवशी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक तसेच टिळक स्मारक ट्रस्टचे व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे. लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर 4 हजार, 5 हजार ते 8 हजार आणि 8 हजार ते 10 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात टेसी थॉमस यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील ‘स्वदेशी’चे तत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या कार्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. थॉमस यांची एकमताने निवड केली आहे, असे डॉ. दीपक टिळक यांनी नमूद केले.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप असून टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. चंद्रकांत पाटील यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित असतील.
1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
टेसी थॉमस भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-4 व 5 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यांना भारताची ’मिसाइल वुमन’ म्हणून ओळखले जाते. ‘अग्नी -4’ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील 3,000 किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर अचूक आदळले. या यशात डॉ. थॉमस यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
टेसी थॉमस यांचा जन्म एप्रिल 1963 मध्ये केरळमधील अलाप्पुझा येथे झाला.  मदर टेरेसा यांच्या नावावरून त्यांचे टेसी हे नाव ठेवण्यात आले. टेसी थॉमस 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांना पक्षाघात झाला. या विकारामुळे त्यांचा उजवा हात काम करत नसे. टेसी थॉमस यांची आई शिक्षिका होती. अशा विपरित परिस्थितीत संघर्ष करीत टेसी थॉमस मोठ्या झाल्या.  थुंबा क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात राहात असल्याने टेसी थॉमस यांना लहानपणापासूनच विमानांचे आणि क्षेपणास्त्रांचे आकर्षण होते.
टेसी थॉमस यांनी 1985 मध्ये कालिकत विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक. तर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमधून 1986 मध्ये ‘लक्ष्याधारित क्षेपणास्त्र’ या विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी मिळवली. हैदराबादमधील जेएनटीयूमधून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. ‘इग्नू’मधून त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले आहे.
1988 मध्ये त्या ‘डीआरडीओ’मध्ये रूजू झाल्या.  डीआरडीओतील अग्‍नी क्षेपणास्त्राच्या नवीन पिढीच्या प्रकल्पासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नेमणूक केली. टेसी 3,000 किमी लांबीच्या अग्नी-3 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या साहाय्यक प्रकल्प संचालक होत्या. अग्नी-4 आणि अग्नी- 5 साठी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले. डॉ. कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ. थॉमस यांनी वाटचाल केली. 2018 मध्ये डीआरडीओच्या वैमानिक प्रणालीच्या त्या महासंचालिका बनल्या.
‘डीआरडीओ’ने उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून त्यांना गौरविले आहे. 2012 मध्ये मेरी क्युरी विज्ञान पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. केरळ सरकारने 2014 मध्ये वनिता रत्नम पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. आंध्र प्रदेश सायन्स काँग्रेस, आंध्र प्रदेश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स यांच्यासह असंख्य संस्थांनी त्यांना गौरविले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.