yuvraj sambhajiraje chhatrapati | माघार घेणार की लढणार? | संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

माघार घेणार की लढणार?

: संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढणार की त्यातून माघार घेणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या (२७ मे) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे.

संभाजीराजेंना राज्यसभा निवडणूक लढायचीच झाली तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच,  शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’-

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी ट्विट करुन आपलं मत स्पष्ट केलं आहे. महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply