Prashant Jagtap Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, तर या ‘सैरभैर टोळी’चे प्रमुख असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलनच बिघडलेले आहे. त्यातूनच, ते काहीही बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. ‘ना घर का ना घाट का,’ अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोक्याचे आहे. त्यामुळे, त्यांनी घरी जावे. घरातील माय-माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहात असतील. दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

जगताप  म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या  सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिला वर्गाबाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत, त्या मातृसंस्थेची काय मानसिकता आहे, हे दिसून आले आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करीत आहेत, हे पाहण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सुप्रियाताईंशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रियाताईंना घरी बसविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आतापर्यंत ते कितीवेळा तोंडावर आपटले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

एकदा राज्यसभा आणि तीनवेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रियाताईंचा संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे, हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची आणि त्याबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. आदरणीय सुप्रियाताईही या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच लीलया पार पाडतात, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंना महिला म्हणून ‘घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा,’ असे म्हणत समस्त महिला वर्गाचा जो अवमान केला आहे, महिलाशक्तीला डिवचण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

बरे, सुप्रियाताईंनी ‘मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन कुणाची भेट घेतली होती,’ इतका साधा प्रश्न उपस्थित केला होता. जर, भाजप नेत्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते, तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु, सुप्रियाताईंनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडण्यात झाला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही.

महिला वर्गाचा अवमान करून पताका फडकावल्याचा आव आणणारे पाटील यांनी घरी जावे. आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या माय – माऊलींपुढे उभे राहून आपण करून आलेला पराक्रम सांगावा. तेव्हा ती माय-माऊलीही तुम्हाला ‘मसणात जा’ बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.

मुळात, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी भाजपला घरी बसविल्याचा राग या ‘सैरभैर टोळी’कडून वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे मजबूत सरकार आहे, हे या ‘सैरभैर टोळी’ने समजून घेण्याची गरज आहे. आता घरी बसलाच आहात, तर स्वयंपाकही शिकून घ्या. त्यात कमीपणा काही नाही. पण, जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करू लागाल, तेव्हाच तुम्हाला माय-माऊलींची किंमत कळेल, त्यांचे दु:ख कळेल, एक महिला काय करू शकते, हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पुन्हा कोणत्याही महिलेचा अनादर करण्यासाठी तुमची जीभ धजावणार नाही, यात तीळमात्र शंका नाही. असे ही जगताप म्हणाले.

Leave a Reply