Sant Tukaram Maharaj | भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.