Indrayani Thadi Jatra | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे ८०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले.

आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.