Registered Hawkers : आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा  : नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

: नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अवैध फेरीवाल्यावर जोरदार कारवाई सुरु आहे. दरम्यान आता आगामी काळात वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण उपायुक्तांनी याबाबतचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील रस्ता, पदपथांवर केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियम-२०१४ चे मधील तरतुदीनुसार तसेच सदर कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून बनविण्यात आलेली पथविक्रेता योजना-२०१७ चे मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत झालेल्या पात्र पथविक्रेत्यांचे मान्य हॉकर्स झोनमध्ये यापूर्वी सर्व संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून रितसर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. पुनर्वसन झालेल्या ज्या व्यवसायिकांकडे सन १९८८ पूर्वीचे अधिकृत स्थिर/हातगाडी/बैठा व गटई (खोंचा) याप्रकारची व्यवसाय साधने वापरून प्रत्यक्ष मान्य झोनमध्ये मान्य ५४४ फुट मापाच्या जागेत व्यवसाय करणे अपेक्षित आहे. तसेच उपरोक्त कायद्याअंतर्गत ज्या अनधिकृत व्यवसायिकांची संगणकीय नोंदणी करून त्यांना सन २०१४ नंतर फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात येवून मान्य झोनमध्ये त्यांचे रितसर पुनर्वसन केलेले आहे, अशा व्यवसायिकांनी त्यांचे मान्य जागी फक्त ५X४ फुट मापाच्या जागेत पथारी अथवा खोंचा ठेवूनच व्यवसाय करणे आवश्यक आहे.

तथापि सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर वारंवार तपासणीत असे आढळून आलेले आहे की, पूर्वीचे अधिकृतव्यवसायिक तसेच सन २०१४ नंतर वरील कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झालेले व्यवसायिक त्यांना नेमून दिलेल्या झोनमधील मान्य मापाचे जागेत वर नमूद केलेनुसार मान्य व्यवसाय साधनांचा वापर करताना आढळून येत नाही. अनेक व्यवसायिकांनी मान्य व्यवसाय साधने ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय साधनामध्ये परस्पर बदल करून उदा. १) मान्य बैठा/गटई परवानाधारकांनी बैठा पथारी लावून अथवा खोंचा ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. २) पूर्वीच्या स्थिर हातगाडीधारकाने प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी सदृश स्टॉल ठेवून व्यवसाय करणे. ३) गटई (खोंचा) ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. इत्यादी प्रकारची अनधिकृत व्यवसाय साधने परस्पर ठेवून व्यवसाय करताना आढळून येत आहे. तसेच सदर साधनांमध्ये अनधिकृतपणे वीज, पाणी, ड्रेनेज कनेक्शन घेणे, व्यवसाय जागेवर पक्क्या स्वरुपात व्यवसाय साधनांची उभारणी करणे इत्यादी बाबी देखील अनधिकृतपणे केल्याचे आढळून येत आहे. या सर्व बाबी परवाना अटी, शर्तीचा भंग करणाऱ्या असून अशा व्यवसायिकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच पथारी/बैठा व्यवसायिकांनी त्यांची व्यवसायाची वेळ संपल्यानंतर त्यांचे सर्व व्यवसाय साहित्य घरी घेवून जावून व्यवसाय जागा रिकामी व स्वच्छ नियमित करून ठेवणे आवश्यक आहे. तसेच पूर्वीच्या स्टॉल किंवा स्थिर हातगाडी व्यवसायधारकांनी मान्य व्यवसाय जागेवर पक्या स्वरूपातील कोणतेही स्ट्रक्चर/ओटा न बनविता त्यांच्या मान्य व्यवसाय साधनावर व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सध्या सुरु असलेल्या संयुक्त कारवाई मोहिमेअंतर्गत वरीलप्रमाणे अटी, शर्तीचा भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर या कार्यालयीन दिनांकापासून संबंधित सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी योग्य ते नियोजन करून प्राधान्याने स्वतः उपस्थित राहून कारवाया चालू करावयाच्या आहेत. आपले कार्यालय हद्दीमधील सर्व पुनर्वसन झालेल्या व्यवसायिकांकडून मान्य व्यवसाय साधनांचा वापर करूनच कायम व्यवसाय करीत राहतील, याबाबत सतत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार  कारवाईचे नियोजन करून केलेल्या कारवाईचा अहवाल दैनंदिनपणे कळविण्यात यावा, असे आदेश अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.

Leave a Reply