Rajya sabha seats | राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक : महाराष्ट्रातून 6 उमेदवार निवडले जाणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक

: महाराष्ट्रातून  6 उमेदवार निवडले जाणार

नवी दिल्ली – राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली.  राज्यसभेतील २४५ जागांपैकी यंदाच्या वर्षभरात ९५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी आता येत्या १० जूनला सर्वाधिक ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे.

महाराष्ट्रातील ६ पैकी २ जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र” वापरू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू असून विरोधी नेते देवेंद्र फडणवीस याबाबतचा ‘अंतिम” निर्णय घेतील, असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणीही होईल. राज्यसभेच्या २४५ पैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पाहता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

विरोधी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेठी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज” चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधीपक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

Leave a Reply