Chandni Chowk pune | चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन

Categories
Breaking News पुणे
Spread the love

चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही

पुणे, दि.१७: पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांतर्गत सेवारस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत बावधन (ता.मुळशी) येथील ५ मिळकतींच्या भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले असून सोमवारी या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूमी संपादन (समन्वय) प्रवीण साळुंखे आणि विशेष भूमी संपादन अधिकारी (क्र.१६) द. दा. काळे यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करीत २० दिवसांच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गतीने उपाययोजनांचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी २ सप्टेंबर रोजी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन या चौकात उभारण्यात येणाऱ्या बहुमजली उड्डाणपूल प्रकल्पासाठी तसेच लगतच्या सेवारस्त्यासाठी आवश्यक उर्वरित जमिनीचे भूसंपादन त्वरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही १ महिन्याच्या आत करण्याची ग्वाही दिली होती. या भूसंपादनामुळे चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाला गती येणार आहे.

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या लगत पुणे महानगर पालिकेच्या विकास योजना आराखड्यात मंजूर सेवारस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन वाटाघाटीने करण्यासाठी पुणे म.न.पा. प्रयत्नशील होती. तथापि, यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणे झाल्यामुळे सदर भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करून देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मार्च २०२२ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी प्राथमिक अधिसूचना काढल्या. त्यानुसार शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी बावधन येथील एकूण ३ हजार २१५ चौ. मी. क्षेत्रफळाच्या ५ मिळकतींचे निवाडे (अवॉर्ड) जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये तातडीने ११ कोटी ४२ लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे. या मिळकती सोमवारी १९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात येऊन महानगरपालिकेकडे व त्वरित महापालिकेकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) हस्तांतरित करण्यात येतील.

या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२० मध्ये ४८ मिळकतींच्या भूसंपादनाचा अंतिम निवडा जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये ६ हे. ५० आर जमिनीचा ताबा घेऊन पुणे मनपाकडे व त्यानंतर एनएचएआयकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर ५ मिळकतींचे भूमीसंपादन पूर्ण होत असल्याने आता चांदणी चौकातील प्रकल्पासाठीची भूसंपादनाची कोणतीही कार्यवाही शिल्लक नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.