Barsu Refinery | रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र
Spread the love

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

| संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं | अजित पवार यांचे आवाहन

मुंबई | रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
००००००