Barsu Refinery | रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

| संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं | अजित पवार यांचे आवाहन

मुंबई | रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
००००००

Konkan | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी | शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी

| शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना राज्य शासनाने पथकर माफी जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करत गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही पथकर माफी असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (एनएच ४८) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या वाहनांना ही पथकर माफी देण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पथकर माफी देण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन पथकर माफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

डॉ. देशमुख म्हणाले, या परिपत्रकानुसार टोलमाफी देण्याचे पथकर नाके चालकांना निर्देश देण्यात आले असून पथकर नाक्यांच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यातील पथकर माफी पास उपलब्ध करुन देण्यात येतील. पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून हे काम केले जाईल.

पथकर माफीसंदर्भातील निर्णयाची माहिती देण्यासाठी पथकर नाके चालकांनाही या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी करून घेण्यात आले होते.

Flood | Maharastra | पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा | मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

 पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा

| मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई  : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एन डी आर एफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या
वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत