Traffic congestion in Pune | पुणे शहरातील वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

पुणे शहरातील वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा

| उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे | पुणे शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी कारणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महामेट्रो, महानगरपालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, कटक मंडळ मिळून आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथे शहरातील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पीएमआरडीचे श्री.खरबडकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार येथील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील मिलेनियन दरवाजा उघडण्यात यावा. शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, चांदणी चौक, वाघोली रस्ता, नवले ब्रीज याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन करावे. आवश्यकतेनुसार बाह्य संस्थेंकडून प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करावी. गणेशोत्सव काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक कोडींवर मात करण्याबाबत नियोजन सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पोलीस आयुक्त श्री गुप्ता म्हणाले, वाहतुक कोंडी नियंत्रणात आण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग प्रयत्न करीत आहे. शहरात जड वाहनांना मुख्य रहदारीच्या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.

मनपा आयुक्त श्री. कुमार यांनी पुणे मनपा कार्यक्षेत्रात वाहतूक कोंडी नियंत्रणात करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत पोलीस प्रशासनास आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचे सांगितले.