Water plus Certificate : वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील! 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र
Spread the love

वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील!

: राज्य सरकार देखील करणार साहाय्य

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मात्र महापालिकेला अजूनही वॉटर प्लस मानांकन मिळालेले नाही. हे मानांकन फक्त नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहे. आता पुणे महापालिका देखील हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील मदत करणार आहे.

: 4 मार्च ला पाहणी दौरा

राज्य सरकार कडून याबाबत महत्वाच्या महापालिका आणि नगरपालिकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य अभियान संचालक अनिल मुळे यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवले आहे.  त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आपण केलेल्या कामगिरीच्या आधारे आपण या स्वच्छ सर्वेक्षण २२ मध्ये “वॉटर प्लस” करिता प्रमाणित होण्याबाबत संचालनालयीन स्तरावर विविध बैठकांमध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात फक्त नवी मुंबई महानगरपालिकेला “वॉटर प्लस” सर्टीफिकेशन मिळालेले आहे. आपल्या महानगरपालिकेने मागील स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेली कामगिरी पाहता आपली महानगरपालिका ही “वॉटर प्लस” होवू शकते हे आपणांस विदीत आहेच. त्याअनुषंगाने आपल्या शहरास हे नामांकन प्राप्त होण्याकरिता आपल्या विविध शंकेचे निरसन होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दिनांक २ मार्च,२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन कार्यशाळा संचालनालयाने आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेस स्वतः मा. प्रधान सचिव संबोधित करणार आहेत. तरी सदरच्या कार्यशाळेस संबधितांना हजर रहाण्यास सांगावे.

तसेच, या प्रशिक्षणानंतर दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये “वॉटर प्लस” मिळविण्याकरिता केलेल्या कामाच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी दौरा देखील आयोजित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने सरकार महापालिकेला मदत करणार आहे.

Leave a Reply