Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
cultural Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही (Shivneri) विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजाचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद-सूर्य आहे तो पर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यात निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरीता प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नित्पाद केला. शिवरायांनी अन्यायाच्याविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्यभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्ताना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, एकतेचा विचार येत्या पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या- खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकामध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावं असे राज्य, स्वराज्य स्थापन त्यांनी केले, याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे.

जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सूचना केली.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे.