State Election Commission | दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

State Election Commission | दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन

 

State Election Commission | निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी (Voter List) शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार तर समान छायाचित्राचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार असून संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी केले आहे. (State Election Commission)

भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेचे आढळुन आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.

या नोटीशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे किवा संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी.

या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही श्री. देशमुख यांनी कळविले आहे.


 

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-२०२४ चा सुधारित कार्यक्रम घोषित

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्यासाठीचा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात छायाचित्र समान नोंदी, भौगोलिकदृष्ट्या समान नोंदी घेणे आणि अर्ज प्रलंबित असल्याने भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.

पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याच्या सध्याची तारीख २६ डिसेंबर २०२३ ऐवजी १२ जानेवारी २०२४, मतदार यादीचे मानांकन तपासणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, अभिलेख अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची तारीख १ जानेवारी २०२४ ऐवजी १७ जानेवारी २०२४ आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे.

राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमती कळसकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी तहसिलदार शितल मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

——

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.