MVA Vs BJP | Pune | महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन

दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची  घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि,  सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही.  याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे, वैशालीताई नागवडे, काँग्रेसचे रमेश दादा बागवे, मोहन जोशी, संगीताताई तिवारी, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,आप्पा रेणूसे,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Balgandharva Theatre : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक : अजित पवार

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

पुणे : महापालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराची नुतनीकरण करण्यात येणार आहे. मात्र नुकतेच रंगमंदिरात नाटक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जे कित्येक दिवस बंद होते. नुतनीकरण करण्यासाठी पुन्हा नाट्यगृह बंद ठेवले तर कलाकारांच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक आहे. अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

: नाट्यगृहे आजपासून सुरु

बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह  पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  म्हणाले,  कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. 19 महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास   नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे.  एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील  संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.  राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी मंजुळे, पवार, इनामदार यांनी नाट्यगृह सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. हा कलावंतांसाठी महत्वाचा दिवस असल्याचे मंजुळे म्हणाले.

प्रास्ताविकात राजेभोसले म्हणाले, सांस्कृतिक विकासासाठी मोठी तरतूद करून शासनाने कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कलाकारांना कौतुकाची थाप मिळेल.

यावेळी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाला नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.