Theatre in Maharashtra | राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार | 386 कोटी रुपये निधी देणार

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Theatre in Maharashtra | राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार

| 386 कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Theatre in Maharashtra | मुंबई : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज येथे सांगितले. (Maharashtra News)

मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत 41 संस्थांना सहाय्यक अनुदान धनादेश वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, शासन प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना मदतीचा हात शासनाकडून दिला जात आहे. आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे पण सुख समृद्धीचा अभाव दिसत आहे, समाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याचा सांस्कृतिक जपत आपले काम सुरू ठेवावे.

प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे काम कलेच्या क्षेत्रातील या संस्था करतात आपले कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम शासनासोबत आपणही करत आहात.

कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत तसेच प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धनादेश वाटप संस्थेची यादी खालील प्रमाणे

पटेल कल्चर फाउंडेशन मुंबई, वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर, अजित बालक मंडळ नागपूर, जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक नागपूर या संस्थांना (प्रत्येकी 2 लाख रुपये.), अय्यर फाउंडेशन मुंबई, संक्रीता फाउंडेशन मुंबई, प्रारंभ कला अकादमी ठाणे, तक्षशिला नृत्य कला मंदिर ठाणे, शाहीर शामराव खडके सांस्कृतिक लोककला मंडळ सावर्डी सोलापूर, जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर,सुंदरी सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सोलापूर, सप्तरंग थिएटर्स अहमदनगर, स्वानंद सांस्कृतिक मंडळ नागपूर, आदित्य बहुउद्देशीय संस्था रामटेक नागपूर, पिराजी बहुउद्देशीय संस्था नागपूर, ऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर, प्रेरणा अल्पसंख्यांक महिला बाल व युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थांना (प्रत्येकी एक लाख रुपये).

बोधी नाट्य परिषद मुंबई, श्री. वल्लभ संगीतालय मुंबई, विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चारीटेबल ट्रस्ट पिंगळी गुढीपूर सिंधुदुर्ग, मराठी साहित्य सांस्कृतिक व कला मंडळ नवी मुंबई, स्वप्निल सपना लोककला विकास मंडळ मानेगाव सोलापूर, स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगाव, चंदन युवक शिक्षण व्यायाम विकास क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर, श्रीकृष्ण सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था नादरपूर छत्रपती संभाजीनगर , जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर , सामाजिक जनजागृती कला विकास छत्रपती संभाजीनगर, बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणी, स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था सिने स्टार अकादमी नांदेड, मानवसेवा सामाजिक प्रतिष्ठान बीड, प्रगती सेवाभावी संस्था पाडळी बीड,

नटराज क्रीडा मंडळ नागपूर, रखुमाई सेवा मंडळ नागपूर, पंचरंगी निशाण खडीगंमत मंडळ नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ नागपूर, नागरी सांस्कृतिक व बहुसंस्था गोंदिया,स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान पातुर, साने गुरुजी कला व सांस्कृतिक कार्य क्रीडा बहु मंडळ अकोला, शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन बुलढाणा, लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक नाट्य मंडळ वाशिम, जय तुळजाई ग्रामीण बहु संस्था उमरसा यवतमाळ या संस्थांना (प्रत्येकी 50 हजार) रुपयांचा धनादेश देऊन अनुदान वाटप करण्यात आले.

*****

Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील 

Categories
Breaking News cultural Political पुणे

Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील

| थेट भेटच्या माध्यमातून बाणेरमधील नागरिकांशी संवाद

Kothrud Constituency | कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील (Minister chandrakant patil) यांनी आज दिली. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी (Theatre in Baner) सर्वतोपरी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी आश्वास्त केले. (Kothrud constituency)

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Minister Chandrakant patil)

नामदार पाटील म्हणाले की, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे इथला प्रत्येक भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केल्यानंतरही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे एकूण ७८ ठिकाणे निदर्शनास आली असून, सदर भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन केल्यानंतर ही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे लोकसहभागातून ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून सदर भागातील कचरा संकलित केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Kothrud constituency)

ते पुढे म्हणाले की, बाणेर मधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसोबत सततच्या पाठपुराव्यामुळे समान पाणीपुरवठा योजने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे बाणेरमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. (Theatre in Baner)

दरम्यान, यावेळी नागरिकांनी बाणेरमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह उभारावे, भागात ठिकठिकाणी टाकलेला राडारोडा, मुरकुटे गार्डन येथे मोठे विश्रांतीस्थान, अवैध फेरीवाले यामुळे होणारा त्रास, स्वच्छता गृहे आदी समस्या मांडल्या. सदर समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल, असे यावेळी आश्वास्त केले. तसेच यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Theatre | पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

| सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृह वर्षभरात नाट्यरसिकांच्या सेवेत होणार हजर

पुणे | पुणे शहरात पुणे महापालिकेकडून अजून एक नाट्यगृह बांधण्यात येत आहे. सिंहगड रोडवर छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृहाचे काम सुरु आहे. याचे जवळपास निम्मे काम झाले असून आगामी वर्षभरात हे नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. यावर्षी बजेटमध्ये त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
800 आसन व्यवस्थेचे हे नाट्यगृह असणार आहे. सोबतच कलादालन देखील असणार आहे. सिंहगड रोडवरील फन टाइम थिएटर च्या नजदिक हे नाट्यगृह होणार आहे. याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. यासाठी 12 कोटीं खर्च येणार आहे. महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून याचे काम करण्यात येत असून जवळपास निम्मे काम पूर्ण करण्यात आले आहे. आगामी वर्षभरात याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी चालू बजेटमध्ये 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरात सद्यस्थितीत महत्वाची 6 नाट्यगृहे आहेत. महापालिकेच्या महत्वाच्या नाट्यगृहामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा रंगमंच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, पं भीमसेन जोशी कलामंदिर, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांचा समावेश आहे. या नाट्यगृहामध्ये चांगलीच गर्दी असते. प्रेक्षक आणि नाटककारांच्या  देखील ही नाट्यगृहे पसंतीस उतरली आहेत. त्याच धर्तीवर सिंहगड रोडवर देखील नाट्यगृह असावे, अशी पुणेकर खासकरून सिंहगड रोडवरील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार मागील बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. आता वर्षभरातच हे नाट्यगृह रसिकांच्या सेवेला हजर होणार आहे.
——
सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम जवळपास निम्मे पूर्ण झाले आहे. आम्हांला सर्व निधी उपस्थित झाल्यास आम्ही याचे पूर्ण काम वर्षभरात पूर्ण करू शकू. यामुळे शहरात अजून एका नाट्यगृहाची भर पडणार आहे. 
 
हर्षदा शिंदे, विभाग प्रमुख, भवन रचना. 

Prashant Damle : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली भावना 

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल

: प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली भावना

: अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन

पुणे : मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे ही नाटकाशी संबंधित सगळ्या कलाकारंची जबाबदारी असते. कारण नाटक हे टीम वर्क असते. पुण्याचे प्रेक्षक चोखंदळ असून पुण्यात नाटक गाजले की, जगभरात गाजते. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुढी पाडवा या हिंदू नववर्षा निमित्त कलावंत साहित्य गुढीचे पूजन आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि डॉ. आशिष धांडे यांच्या हस्ते आणि पुण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख आणि पदाधिकारी तसेच ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील कलावंतांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी दामले बोलत होते.

यावेळी पुणे महानगर पालिकेतील शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष आणि संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संगीता बर्वे, नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख प्रकाश पारखी, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील मते, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे, अॅड. अर्चिता जोशी, समीर हंपी, सत्यजीत धांडेकर, प्रवीण बर्वे, दीपक गुप्ते, केतकी बोरकर, तसेच अभिनेत्री पौर्णिमा अहिरे, उदय लागू यांच्यासह ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील सगळे कलाकार उपस्थित होते.

यावेळी सावनी रवींद्र यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून ‘कौसल्येचा राम बाई’ या गीताच्या काही ओळी सादर केल्या. वर्षा उसगावकर, पृथ्वीराज सुतार, सुनीताराजे पवार, प्रकाश पारखी, निकीता मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजना मागील भूमिका विशद केली. सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.

 

Balgandharva Theatre : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक : अजित पवार

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

पुणे : महापालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराची नुतनीकरण करण्यात येणार आहे. मात्र नुकतेच रंगमंदिरात नाटक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जे कित्येक दिवस बंद होते. नुतनीकरण करण्यासाठी पुन्हा नाट्यगृह बंद ठेवले तर कलाकारांच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक आहे. अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

: नाट्यगृहे आजपासून सुरु

बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह  पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  म्हणाले,  कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. 19 महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास   नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे.  एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील  संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.  राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी मंजुळे, पवार, इनामदार यांनी नाट्यगृह सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. हा कलावंतांसाठी महत्वाचा दिवस असल्याचे मंजुळे म्हणाले.

प्रास्ताविकात राजेभोसले म्हणाले, सांस्कृतिक विकासासाठी मोठी तरतूद करून शासनाने कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कलाकारांना कौतुकाची थाप मिळेल.

यावेळी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाला नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.