Precautionary dose | महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा  | प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा

| प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन

कोविड १९ लसीकरण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्फत दि. १५ जुलै २०२२ पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांना निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड लसीचा प्रिकॉशन डोस देणेस सुरुवात करणेत येत आहे.

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांना तसेच १५ क्षेत्रीय कार्यालांतर्गत असणाऱ्या पुणे मनपा ६८ दवाखाने व रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
तरी पुणे शहरातील सर्व नागरिकांनी आपले घराजवळील पुणे मनपाच्या दवाखान्यात / रुग्णालयात जाऊन ( दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर तसेच त्यांना ३ महिन्यामध्ये कोव्हीड संसर्ग झालेला नसल्यास) निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड
लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रम कुमार यांनी केले आहे.