Chandani Chauk | ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास NHAI जबाबदार राहणार नाही चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन

Categories
Breaking News पुणे

ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास  NHAI जबाबदार राहणार नाही

| चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रं. ४ वरील चांदणी चौक जंक्शन येथे कि.मी. ८४२.५८० वर फ्लायओव्हर व त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम प्रगतीवर आहे.
या प्रकल्पांतर्गत हायवेवरील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) एन.डी.ए / मुळशी ओव्हरपास तोडून त्या ठिकाणी नवीन ओव्हर पास बांधणे प्रस्तावित आहे. अस्तित्वातील ओव्हरपासची पाहणी केली असता त्यावरुन काही सेवा वाहिन्या (पाणी पुरवठा, टेलीफोन, विदयूत वाहीनी, ओएफसी केबल्स इ.) टाकलेल्या निदर्शनास आले. सदरील अस्तित्वातील ओव्हरपास दि. १२.०९.२०२२ ते १५.०९.२०२२ च्या दरम्यान पाडण्याचे नियोजन आहे.
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व जनतेस विनंती करण्यात येते की, संदर्भीय ओव्हरपासच्या दरम्यान आपल्या काही सेवा वाहिन्या असल्यास दि. १०.०९.२०२२ पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्यात याव्यात. त्यानंतर जर ओव्हरपास तोडताना काही नुकसान / असुविधा झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. राष्ट्रीय कामास सहकार्य करावे ही विनंती. असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी म्हटले आहे.

Chandni Chowk traffic jam | चांदणी चौक वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गतीने कार्यवाही

Categories
Breaking News पुणे

चांदणी चौक वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गतीने कार्यवाही

पुणे | चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून सध्या अस्तित्वात असलेला जुना पूल पाडून नवीन चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अस्तित्वातील ओव्हरपासवरील सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

पुणे शहरातील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून निघालेल्या निष्कर्षानुसार येत्या १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान अस्तित्वातील जुना अरुंद पुल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्याचे ठरले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील ओव्हरपास वरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठीचे काम सुरु झालेले आहे.

सुरू असलेल्या कामानुसार सध्या नविन पूलाच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूच्या अबटमेंटच्या खोदकामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या वेद भवन समोरील अस्तित्वात असलेल्या सेवा रस्त्याच्या भरावाचे काम सुरु करण्यात आले आहे. महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रृंगेरी मठासमोरील सेवा रस्त्यावरील राडारोडा उचलून रस्ता वाहतूकीस खुला करण्यासाठीचे काम प्रगतीत आहे. पुढील आठवड्यात सेवा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल. मुळशी ते सातारा रॅम्पचे काम प्रगतीत असून पुढील सात दिवसात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत आवश्यकतेनुसार वाहतूक मार्शलची नेमणूक करण्यात येत आहे, असेही श्री. कदम यांनी कळवले आहे.

Traffic problem in Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल
मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.

आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणार त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको’ हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.