Kasba by-election | २ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

२ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान

| कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण

पुणे |  कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*मतदान कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था*
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या ४३ बसेस, ७ मिनीबस आणि १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.

*टपाली मतदानाची सुविधा*

निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी ५४ कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या ५४ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार आज संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
00000

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात | कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

Categories
Breaking News Political पुणे

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात

| कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

पुणे | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

Kasba peth byelection | कसबा पेठ मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

Categories
Breaking News पुणे

कसबा पेठ मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

पुणे | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकी निमित्ताने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. विविध पथकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून पथकांमार्फत आतापर्यंत २४ फलक, ३८९ पोस्टर्स व ६६ झेंडे काढण्यात आले आहेत. पोलिसांमार्फत विविध ९ तपासणी नाक्यांवर दररोज ३ पाळ्यांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येत असून आजपर्यंत ९ हजार ८२५ रुपये किमतीची सुमारे १८३ लिटर दारू हस्तगत करण्यात आली.

उमेदवारांच्या सुविधेसाठी कसबा पेठ मतदारसंघाच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत आजपावेतो ५ सभा, ६६ पदयात्रा, १० वाहन परवाने, ७ तात्पुरती पक्ष कार्यालये/स्टेज इत्यादीसाठी परवाना पत्र देण्यात आले आहेत. कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे ९ आणि सीव्हीजील ॲपवर एकूण ४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

उमेदवारांचे प्रचार खर्चाबाबतदेखील स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून याबाबत दररोज उमेदवारांच्या खर्चाचा तपशील या कार्यालयाकडे प्राप्त होत असून त्याचा लेखाजोखा घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा दक्षता घेत असून मतदानाची पूर्वतयारी करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रीयेत निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, निवडणूक पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा, ‍निवडणूक खर्च निरीक्षक मंझरूल हसन यांचे मार्गदर्शन होत आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीदेखील आढावा बैठका घेऊन निवडणूक प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती २१५-कसबा पेठ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.