Open Market | PMC | सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र शेती

सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

पुणे | वाहतुकीला अडथळा होतो म्हणून रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला त्रास देणे महापालिका अतिक्रमण विभागाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या विरोधात शेतकरी आणि सदाभाऊ खोत यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. खोत यांच्या आंदोलनांतर महापालिकेने शहरात 50 ओपन मार्केट सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या जागेवर बसून शेतकरी आपला माल विकू शकतात. त्यासाठी प्रति दिन 100 रुपये भाडे आकारले जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहराच्या विविध भागात हे मार्केट असतील.  शेतकऱ्यांसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातील. मात्र जुन्या मार्केट शेजारी हे गाळे नसतील. याठिकाणी शेतकरी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपला माल विकू शकतील. लवकरच महापालिका यावर अंमलबजावणी करणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

| सदाभाऊ खोत यांनी महापालिकेसमोर विकले कांदे!

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल 40 हजार रूपयांचा दंड लावू असे सांगितले होते. तसेच गेल्या आठ दिवसापासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी पळवित होती. त्याच्या निषेधार्थ  माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेच्या दारातच कांदा विक्री केली.

शेतकरी आधीच होरपळला असताना महापालिकेची ही कारवाई त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने तातडीनं ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या वेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले.