Vaikunth Crematorium | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा |  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे |  वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे विद्युत विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या, वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी करावी.

वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. खेमणार यांनी माहिती दिली, पुणे महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यदृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नीरी आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
0000