PMC : Ganesh Bidkar : विरोधी पक्षाचे नगरसेवक भ्रष्ट्राचारावर बोलतात ही किती चांगली गोष्ट! : सभागृह नेत्यांनी सभागृहात काढले चिमटे

Categories
PMC Political पुणे
Spread the love

विरोधी पक्षाचे नगरसेवक भ्रष्ट्राचारावर बोलतात ही किती चांगली गोष्ट!

: सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभागृहात काढले चिमटे

पुणे : महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचारावरून गुरुवारच्या मुख्य सभेत विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला दिसला. प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील यावेळी केली गेली. मात्र याच प्रकरणावरून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपल्या वेगळ्या शैलीत बोलत विरोधी नगरसेवकांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. याबाबत आता सर्वपक्षीय नगरसेवक गंभीर झाले आहेत. कारण त्यांना आगामी काही दिवसांत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जायचे आहे. त्यामुळे आता याबाबत सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महापालिका बदनाम होतेय; आता तरी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार की नाही? का फक्त नगरसेवकांवरच गुन्हे दाखल करणार? असे प्रश्न नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. शिवाय भ्रष्ट प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. दरम्यान याबाबत विरोधी पक्ष मात्र चांगलाच आक्रमक झाला होता. सर्व विरोधी बाकावरील नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मुद्दे काढत अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

त्यानंतर शेवटी सभागृह नेते गणेश बिडकर यांचे भाषण झाले. यावेळी बिडकर यांनी आपल्या वेगळ्या शैलीत विरोधी नगरसेवकांना चिमटे काढले. बिडकर म्हणाले, आबा बागुल भ्रष्टाचारावर बोलतात, अविनाश बागवे गहाळ झालेल्या फाईलवर बोलतात, अरविंद शिंदे भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवतात, गफूर पठाण भ्रष्ट्राचार सारख्या विषयावर बोलतात, म्हणजे ही खूपच छान गोष्ट झाली. मात्र सभागृह नेत्यांचा हा बोलण्याचा अंदाज विरोधी नगरसेवकांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि मूळ विषयावर बोलण्याची मागणी केली. त्यावर सभागृह नेत्यांनी सांगितले सर्व नगरसेवक आपल्या भाषणात विषय सोडूनच बोलत होते. त्यामुळे मग मलाही अशी भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर मग सभागृह नेत्यांनी मूळ विषयावर येत अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र सभागृह नेत्यांच्या या अंदाजाची पालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.

 

Leave a Reply