Working in Septic Tank, Sewer Line | सेप्टिक टँक, भूमिगत गटारे मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी 

Categories
Breaking News social महाराष्ट्र
Spread the love

Working in Septic Tank, Sewer Line | सेप्टिक टँक, भूमिगत गटारे मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Working in Manhole – (The Karbhari News Service) – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies) हद्दीत भूमिगत गटारे (Sewer Lines), सेप्टीक टँक (Septic Tank) इत्यादी बंदिस्त जागेमध्ये साफसफाई करताना कामगार मृत झाल्याबाबतच्या घटना घडत आहेत. यामुळे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून बंदिस्त जागा उदा. सेप्टिक टैंक, भूमिगत गटारे इत्यादी मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत यापूर्वी स शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयान्वये सेप्टीक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता संपुर्णपणे यांत्रिकी पध्दतीने करण्याच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित
करण्यात आल्या आहेत. तसेच, मॅनहोलमध्ये उतरुन कामकरीत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्युच्या घटना टाळण्यासाठीच्या हेतुने  सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिघ्रकृती दल (Emergency Response Sanitation Unit ERSU) स्थापन करण्यात आले आहेत. तथापि, अद्यापही अशा प्रकारच्या घटना राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना  पुन्हा सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. (Maharashtra State Circular)

१) बंदिस्त जागांची साफ- सफाई प्राधान्याने यांत्रिक पद्धतीने अथवा मशिनद्वारे करण्यात यावी आणि केवळ अपरिहार्य परिस्थितीतच कामगारांमार्फत साफ-सफाई करण्यात यावी.
२) बंदिस्त जागांची कामगारांमार्फत साफ-सफाई करण्यापूर्वी बंदिस्त जागेची खोली (Depth) मोजण्यात यावी. तसेच संबंधित बंदिस्त जागेबाबतचा सविस्तर तपशील समजून दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सुयोग्य सुरक्षिततेचे उपाय अंमलात आणावेत.

३) बंदिस्त जागांमध्ये काम करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यात यावे व असे प्रशिक्षणयशस्वीरीत्या पूर्ण केल्याबाबत संबंधित कामगारास प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच अशा प्रकारे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या कामगारांनाच सेप्टीक टॅक, भुमिगत गटारे या सारख्या बंदिस्त जागांमध्ये अपरिहार्य परिस्थितीतील काम करण्यास परवानगी देण्यात यावी.
४) बंदिस्त जागेमध्ये काम सुरु करण्यापूर्वी तेथील हवा ही विषारी व ज्वालाग्राही वायू, धूळ यापासून मुक्त असल्याबाबत तसेच त्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त हवेची कमतरता नसल्याबाबत तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
५) योग्य व ताज्या हवेच्या पुरेशा पुरवठ्याची खातरजमा करण्यासाठी यांत्रिक वायुविजनाची (Mechanical Ventilation) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. बंदिस्त जागेत थेटऑक्सिजन वायूचा वापर केल्याने आग किंवा स्फोटाचा धोका वाढत असल्याने, त्या ठिकाणची हवा सुयोग्य करण्यासाठी थेट ऑक्सिजन वायूचा वापर करू नये.
६) बंदिस्त जागांमध्ये कामगारांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यापूर्वी अथवा त्या ठिकाणी काम सुरु करण्यापूर्वी सुरक्षिततेबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आल्याबाबतचा सुरक्षितता परवाना साईट मॅनेजर ने देणे आवश्यक राहील.
७) बंदिस्त जागेच्या बाहेरील बाजूस उपस्थित राहण्यासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बंदिस्त जागेत प्रवेश केलेले सर्व कामगार बाहेर येईपर्यंत अथवा त्यांच्या जागी
अन्य प्रशिक्षित कामगार येईपर्यंत बाहेरील प्रशिक्षित कामगार त्यांच्या जागेवर उपस्थित असतील.
८) बंदिस्त जागेत प्रवेश करण्यापूर्वी, प्रत्येक कामगाराने सुरक्षित वेश, सुरक्षित चष्मा परिधान करावा. तसेच सुयोग्य श्वासोच्छवास उपकरण (breathing apparatus) सोबत असणे व आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास कामगारास ओढून बाहेर काढता येईल अशा पुरेशा मजबूत दोरखंडास (rope) सुरक्षितपणे जोडलेला पट्टा (safety belt) असणे आवश्यक आहे.
९) बंदिस्त जागेत काम करणाऱ्या कामगारास अस्वस्थ वाटल्यास त्या कामगारास लगेच तेथून बाहेर काढण्यात येईल.
१०) बचाव कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी ठराविक कालांतराने मॉक ड्रीलस् (Mock Drills) आयोजित करण्यात यावेत आणि संबंधित कामगारांना बचाव कार्याच्या कार्यपद्धतीचे ज्ञान असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
११) कामगार नुकसान भरपाई अधिनियम, १९२३ मधील तरतुदीनुसार त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने / राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या निर्देशानुसार मृत अथवा जखमी कामगारास देय असणारी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रमुख नियोक्त्याची (contractor & principle employer) असेल.
१२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी काही खाजगी संस्था / व्यक्ती सेप्टिक टैंक, भूमिगत गटारे इत्यादी बंदीस्त जागेमध्ये साफसफाई करण्यासाठी कामगार अथवा खाजगी संस्था यांची नेमणूक करत असल्याचे निदर्शनास आले असून अशा प्रकरणामध्ये नेमण्यात येणारे कामगार हे पूर्णतः प्रशिक्षित असणे व अशा संस्था व त्यांचे कामगार यांची
संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दरवर्षी नोंदणी असणे आवश्यक आहे.
१३) सेप्टिक टँक, भूमिगत गटारे इत्यादी बंदीस्त जागेमध्ये काम करताना उपरोक्त नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त संभाव्य दुर्दैवी घटना टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.