Chalo Chipko | पुण्यातील पर्यावरणप्रेमी संस्थांद्वारे  ‘चलो चिपको’ आंदोलनाची साद | 29 एप्रिल ला केले जाणार आंदोलन 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पुण्यातील पर्यावरणप्रेमी संस्थांद्वारे  ‘चलो चिपको’ आंदोलनाची साद

| 29 एप्रिल ला केले जाणार आंदोलन

पुणे | पुणे महानगर पालिका राबवत असलेल्या नदीसुधार प्रकल्पासाठी बंडगार्डनजवळ मोठ्या प्रमाणावर नदीकाठांवरील हिरवाई उध्वस्त केली जात आहे. पुण्यात पर्यावरण साक्षरतेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था व व्यक्ती एकत्र येऊन पुणे मनपाच्या या कृत्याचा तीव्र निषेध करणार आहेत. 29 एप्रिल ला पुण्यातील पर्यावरणप्रेमी संस्थांद्वारे  ‘चलो चिपको’ आंदोलनाची साद देत आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत या संस्थांकडून आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यानुसार नदीसुधार प्रकल्पासाठी बनवलेल्या प्रकल्प अहवालात नदीकाठी सध्या असलेल्या वृक्षांचा प्रकल्पाच्या वास्तुरचनेत समावेश करण्यात आला आहे असा दावा मनपाने केला आहे. परंतू प्रकल्पाची झलक दाखवण्यासाठी चालू असलेल्या केवळ १ किमी अंतरातील कामामध्ये अक्षरशः हजारो वृक्षांवर तोडण्यासाठी चिन्हांकन केलेले आहे. यात कित्येक जुनी तर कित्येक दुर्मिळ झाडे समाविष्ट आहेत. या तोडीची भरपाई करण्यासाठी वेगळी वृक्ष लागवड करू तसेच काही वृक्षांचे पुनर्रोपण करू असे मनपातर्फे म्हटले जात आहे. पण भरपाईसाठीच्या वृक्ष लागवडीसाठी जागा किंवा वेळापत्रकाच्या नियोजनाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पुनर्रोपणाने झाडे जगवण्यातील यशाचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असून आत्तापर्यंत पुर्नरोपणाच्या उपाययोजना पूर्णतः अयशस्वी ठरलेल्या आहेत. या साऱ्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे नदीकाठ ज्या पध्दतीने उजाड केले जात आहेत त्यात केवळ वृक्षच नाही तर एकंदरीतच नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अधिवास आणि त्याला जोडून असणारे जैववैविध्य नष्ट होत आहे.
हिरवाईच्या जैववैविध्याच्या या ऱ्हासामुळे  जागतिक तापमानवाढीच्या परिणामांना हातभार लागून उष्णतेच्या लाटा तसेच पूर व पाणी तुंबणे यासारख्या धोक्यांची तीव्रताही वाढणार आहे. एकंदरीतच पुणे मनपाची ही कृती म्हणजे पुण्याच्या नागरिकांचा विश्वासघात आहे.
अलीकडेच हजारो पुणेकरांनी वेताळ टेकडीवरील नियोजित रस्ते आणि योगद्यांचाही निषेध केला ज्यामुळे डोंगरातील पर्यावरणाचाही अपरिवर्तनीयपणे नाश होईल. हिरवळ आणि जैवविविधतेचे एकत्रित नुकसान हवामानातील बदल, उष्णतेच्या लाटा तीव्र होणे, पूर येणे आणि पाण्याची टंचाई निर्माण करणे, या सर्व गोष्टी पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहेत. ३१ मार्च २०२३ रोजी आमच्यापैकी काही जणांचा पर्यावरण क्षेत्रातील कामाबद्दल राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून पुणे मनपाने ‘पर्यावरण दूत’ अशी उपाधी देऊन सन्मान केला. पण मनपाच्या अनिर्बंध वृक्षतोडीबाबत आमच्यासह इतर अनेक नागरिकांनी हरकती घेऊनही त्यांची दखल घेतली जात नाही. या हरकतींवर सुनावणी घेणे कायद्याने बंधनकारक असूनही पुणे मनपा यात टाळाटाळ करते आहे. दरम्यान नदीकाठांवर वृक्षतोड व नैसर्गिक अधिवासांची कत्तल चालूच आहे. आमच्या मागण्यांकडे मनपाकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने पर्यावरण दूत म्हणून काम करण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. आपली घटनात्मक चौकट आपल्याला काही जबाबदात्याही देते. आम्ही सर्व कायद्याचे पालन करणारे आणि जबाबदार नागरिक आहोत आणि आम्ही कलम SIA (G) अंतर्गत, कलम 48 (A) अंतर्गत राज्याची जबाबदारी म्हणून आणि कलम 21 अंतर्गत आमच्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहोत. निषेध म्हणून आम्ही पीएमसी आयुक्त  विक्रम कुमार यांनी आम्हाला दिलेला पुरस्कार परत करत आहोत. त्यामुळे पुणे मनपा आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी आम्हाला दिलेली प्रशस्तीपत्रे आम्ही परत करत आहोत.
29 एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्याचबरोबर या अनिर्बंध वृक्षतोडीबाबत जनसुनवाई म्हणून आम्ही डेक्कन जिमखाना येथील संभाजी उद्यानाजवळ ‘चलो चिपको’ हे आंदोलन करणार आहोत. पुण्यातील सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन पुणे व परिसरातील नैसर्गिक परिसंस्था अबाधित ठेवण्याच्या आमच्या मागणीत आपला आवाज मिसळावा असे आवाहन या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.