Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल

| वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त 
| मुख्य सभेची मिळाली मान्यता
पुणे | महापालिकेच्या सहायक महापालिका आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत बदल केला जाणार आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या पद्धतीत बदल केला गेला आहे. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला आहे. यानुसार अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली आहे.
महापालिका सेवा नियमावली नुसार सहायक महापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकी संवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे.

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी आहे. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती.

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमावली २०१४ मध्ये “लिपिक टंकलेखक”, वर्ग ३ ते “उप आयुक्त”, वर्ग १ अशी पदोन्नतीची लॅडर आहे. सदर साखळीमधील “सहाय्यक महापालिका आयुक्त”, वर्ग १ हे पद २५% नामनिर्देशन, ५०% पदोन्नती ( नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणा-या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे प्रशासन अधिकारी (विभाग प्रमुख) संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून किमान ०३ वर्षांचा अनुभव)  व २५% प्रतिनियुक्ती मधून भरण्यात येते.
मात्र  पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये परिशिष्ट-१ मधील अट
क्रमांक ९ पुढील प्रमाणे आहे.
तांत्रिक पदांना अतांत्रिक संवार्गामध्ये पदोन्नती देता येणार नाही.
सबब, पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये “सहाय्यक महापालिका आयुक्त, वर्ग-१” या पदांच्या विहित करण्यात आलेली नेमणुकीची पद्धत, टक्केवारी व शैक्षणिक अर्हतेबाबत
खालीलप्रमाणे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
त्यानुसार आता नवीन पद्धत अशी असेल.
1. नामनिर्देशन – २५%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
3. प्रतिनियुक्ती- २५%
महानगरपालिका शासकीय  सेवेतील / स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील वर्ग-१ या पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव धारण करणारे अधिकाऱ्यांमधून.
या बदलानुसार पुढील नेमणूक करण्यात येणार आहे. विधी समितीच्या माध्यमातून सादर केलेल्या या प्रस्तावाला नुकतीच मुख्य सभेने मान्यता दिली आहे.