Yatra in Gormale | गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र शेती
Spread the love

गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!  

 

| सामाजिक सलोखा जपणारी आणि नात्यांना एकत्र आणणारी यात्रा 

 
 सामाजिक एकोपा राहावा आणि लोकांमध्ये एकीची भावना वाढीस लागण्यासाठी ग्रामीण भागात यात्रा भरवण्याची प्रथा सुरु झाली. सामाजिक सलोख्याचे हेच दर्शन गोरमाळे (ता.बार्शी) गावातही दिसून येते. चैत्र महिन्यात अष्टमीला सुरु होणारी तीन दिवसीय यात्रा पंचक्रोशीत चांगलीच प्रसिद्ध आहे. यात्रेचे विशेष म्हणजे छबिना आणि सोंगे. सोंगे सादर करण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरु झाली, हे कुणी सांगू शकणार नाही. मात्र त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. त्यामुळे या सर्वांचे आणि गावाचेही सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.
 
 
चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला ‘आंबील’ चा नैवेद्य असतो. यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली जातेय. आधुनिक  जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
 सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्याविष्कार अर्थात सोंग यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. हातात कुठलाही माईक नसताना आपल्या भारदार आवाजाच्या जोरावर ‘प्रधानजी..! आपल्या कचेरीचा बंदोबस्त कैशा प्रकारे ठेविला आहे?’ ही ललकारी ऐकू येते तेंव्हा उपस्थित लोकांच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.

 बैलांची संख्या कमी झाली म्हणून काय झाले?
ग्रामीण भागात आता चांगली आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक अवजारांवर भर न देता नवीन सामग्रीचा वापर केला जातो. यामुळे साहजिकच शेतीसाठी बैलांचा वापर कमी प्रमाणात होताना दिसतो. याचे पडसाद यात्रेत उमटताना दिसतात. कारण सोंगे सादर करताना राक्षस पार्टी आणि देव पार्टी हे एकमेकासमोर शत्रू म्हणून उभे राहून भाषणाच्या माध्यमातून आव्हान देत असतात. ही गोष्ट बैलगाडीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सादर करता येते. मात्र बैलांची संख्या कमी झाल्याने या कलाकारांची ऐन वेळेला पंचाईत होते. यावर देखील याच कलाकारांनी उपाय शोधून काढला आहे. छोटे पिकअप किंवा ट्रॅक्टर च्या माध्यमातून देखील आता आपली कला सादर करण्यास सुरुवात झाली आहे. आणि यात आघाडीवर लहानगे असतात. या ‘मार्ग’ शोधण्याचे प्रयत्नाचे देखील विशेष कौतुक होत राहते. पूर्वी सोंगे सादर करणारी ठराविकच मंडळी होती. मात्र आता त्याचे सर्वांना आकर्षण वाढू लागले आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. या सहभागामुळे मात्र यात्रेतील हा पारंपारिकपणा जपण्यास मदत होणार हे नक्की आहे.
 गावात पैलवान घडणे गरजेचे!
तीन दिवसीय यात्रेत शेवटच्या दिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते. यासाठी आसपासच्या गावातून बरेच पैलवान आपली ताकद आजमावायला येतात. त्यासाठी यात्रा कमिटीच्या माध्यमातून तात्काळ रोख बक्षिसे देखील दिली जातात. पूर्वी गावातील पैलवान बरीच बक्षिसे पटकावत असत. पण आता मात्र गावात तुरळकच पैलवान दिसून येतात. त्यामुळे बाहेरच जास्त बक्षिसे जातात. यावर उपाय म्हणजे गावातच जास्तीत जास्त पैलवान घडणे आवश्यक आहे. तसे बळ युवकांना द्यायला हवंय. त्यांनीही तशी तयारी दाखवायला हवीय. जेणेकरून कुस्ती स्पर्धेत अजून व्यावसायिकता आणता येईल आणि गावाची यात्रा अजून प्रसिद्ध होईल.