Khadakwasla – Kharadi Metro | खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित  | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे
Spread the love

खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

| महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

पुणे : महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत. या पूर्वी हा मार्ग मेट्रो आणि पीएमआरडीएकडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र, पुम्टाच्या बैठकीत हा स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, महामेट्रोने हा डीपीआर तयार केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हा प्रारूप आराखडा असून महापालिका प्रशासनाकडून त्यात, बदल सुचविल्यानंतर अंतिम आराखडा करून राज्यशासन तसेच केंद्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

हा मार्ग खडकवासला-सिंहगड रस्ता- स्वारगेट- शंकरशेठ रस्ता- राम मनोहर लोहिया उद्यान- मुंढवा चौक – खराडी असा असणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेच्या समोरून गणेश कलाक्रीडा मंचाच्या समोरून जेधे चौकातून शंकरशेठ रस्त्याने पुढे जाणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून स्थानके तसेच मेट्रो मार्गासाठी जास्तीत जास्त शासकीय जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. या शिवाय, ज्या ठिकाणी रस्त्यांची रूंदी कमी आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने खांबाची उभारणी केली जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

खडकवासला, दालवेवाडी, नांदेडसिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजारामपूल, पु.ल देशपांडे उद्यान, दांडेकरपूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे छावणी, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर आणि खराडी चौक ही स्थानके असणार आहेत. तर स्वारगेट येथे नेहरू स्टेडीयमच्या समोर स्थानक असणार असून या ठिकाणी येऊन प्रवाशांना स्वारगेट भूमिगत मेट्रोने पिंपरी-चिंचवड तसेच कात्रजकडे जाता येणार आहे, तसेच स्वारगेट येथील मल्टीमॉडेल हबचे पार्किंगच या कामासाठी वापरता येणार आहे.