Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्गी लावणार

|आमदार सुनिल टिंगरे यांना महापालिकेचे लेखी आश्वासन

| लाक्षणिक उपोषण घेतले मागे

पुणे |वडगाव शेरी मतदार संघातील  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. पुढील आठवड्यापासूनच त्यावर कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार सुनिल टिंगरे यांना दिले. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.


वडगाव शेरी मतदारसंघात नगर रस्ता, पोरवाल रस्ता वाहतूक कोंडी, रखडलेले रस्ते, खराडी, शास्त्रीनगर, विश्रांतवाडी येथील रखडलेले उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न इत्यादी प्रलंबित प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे आमदार सुनिल टिंगरे यांनी या प्रलंबित प्रश्नांसाठी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिका भवनासमोर गुरुवारी सकाळ दहा पासून उपोषण सुरू केले होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह माजी नगरसेवक महेंद्र पठारे, अविनाश साळवे, उषा कळमकर, मीनल सरवदे, शितल सावंत, अ‍ॅड. रुपाली ठोंबरे पाटील, सतिश म्हस्के, महिला शहराध्यक्ष मृणाली वाणी, राकेश कामठे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, मतदारसंघाचे अध्यक्ष नाना नलावडे, महिला अध्यक्षा नीता गलांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान आमदार टिंगरे यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांच्यासह शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सांगितले. मात्र, आपण मांडलेले प्रश्न नक्की किती कालावधीत सोडविणार यासंदर्भात प्रशासनाने लेखी द्यावे अशी भुमिका घेतली. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपायुक्त सचिन इथापे व शहराध्यक्ष जगताप यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन आमदार टिंगरे यांनी उपोषण मागे घेतले.
—————–