Murlidhar Mohol on Pune Rain | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

Murlidhar Mohol on Pune Rain | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

 

Murlidhar Mohol on Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी दिल्ली येथून व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या. शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करुन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत? याचीही विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. (Pune Municipal Corporation (PMC)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूरपरिस्थितीनिर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच ‘वर्क ॲार्डर’ देण्यासंदर्भातही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांसाठी १४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर प्राप्त करुन देण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारकडून पूर नियंत्रणासाठी आपण २०० कोटींचा विशेष निधी पुणे शहरासाठी आणला असून त्याबाबतच्या कामांच्या नियोजनाचा आढावाही यावेळी घेतला. शिवाय पुण्यात पुन्हा पहिल्या पावसासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठीच्या स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपात्कालीन व्यवस्थापनाचे फोन लागत नसणे आणि उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबतही तातडीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीस महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पृथ्वीराज व्ही.पी., विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल, सांडपाणी व्यवस्थापनचे श्री. संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख  गणेश सोनुने यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मोहोळ यांच्याकडे या पदांची जबाबदारी 

पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मोहोळ पहिल्यांदाच खासदार झाले असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा होती. अखेर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज खातेवाटप करण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्य मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.