Contract Employees | ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांचा असंतोष सहन करावा लागेल | राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांचा असंतोष सहन करावा लागेल

| राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

पुणे – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे बोनस मिळावा,वेळेवर पगार मिळावा,या व इतर कायदेशीर मागण्या संदर्भात महानगरपालिकेतील विविध खात्यातील सुरक्षा रक्षक, पाणी पुरवठा, स्मशानभूमी कर्मचारी, आरोग्य विभाग,वाहन चालक इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्यां कंत्राटी कामगारांनी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलने केली. प्रत्येक वेळी महापालिका प्रशासनाने बैठक घेऊ, निर्णय घेऊ असे आश्वासन दिले परंतु अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता ऐन दिवाळीत कंत्राटी कामगारांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
वास्तविक पाहता कंत्राटी कामगार अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार कंत्राटदाराने पगार किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यास मुख्य नियोक्ता म्हणून महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. त्याचप्रमाणे याच कायद्यातील तरतुदीनुसार समान काम समान वेतन दिले गेले पाहिजे. त्याच अनुषंगाने महापालिकेतील कायम कामगारांना ८.३३टक्के बोनस व १९००० रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कंत्राटी कामगारांना पगार देण्यात आलेला नाही. यामध्ये सुरक्षा रक्षकांना गेली २ महीन्यापासून पगार देण्यात आलेला नाही या संदर्भामधे क्रिस्टल कंपनीने हात वर केले आहे. असे अनेक कंत्राटदाराने पगार प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविक पाहता पुणे महानगरपालिकेला कामगार उपायुक्त कार्यालयाने कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत पत्र  पाठवले आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून निर्णय घ्यावा अन्यथा: ऐन दिवाळीत कंत्राटी कामगारांच्या असंतोषाला पुणेकरांना सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांनी दिला आहे.