Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

|  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Shivgarjana Mahanatya | मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट… मोगलांचे आक्रमण आणि त्यांच्या लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या मावळ्यांच्या चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा, तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप… संपूर्ण शिवकालीन इतिहास शिवप्रेमीसमोर अवतरला.

वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग व पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून या ‘शिवगर्जना’ महानाट्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मा. आमदार रामभाऊ मोझे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, माजी विशेष पोलीस महनिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

The karbhari - Shivgarjana Mahanatya pune
शिवगर्जना महानाट्याला रसिकांची गर्दी

यावेळी आमदार टिंगरे म्हणाले, पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन त्यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले.
दरम्यान हे नाट्य पाहण्यासाठी शिवप्रेमींनी उस्फूर्त गर्दी केल्याने अनेकांना खुर्च्याही न मिळाल्याने त्यांनी उभे राहुन हे नाट्य पाहिले. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः दोन तास समोर बसून हे नाट्य पाहिले. महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमून गेला.

भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास

देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.

‘शिवगर्जना’ महानाट्याचे सोमवार दि. २६ फेब्रुवारीपर्यंत साय. ६ : ३० ते ९ : ३० यावेळेत आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.