Show cause notice | महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

| वेळेचे उल्लंघन केल्याने प्रशासनाकडून कारवाई

पुणे | पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने  157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. वेळेचे उल्लंघन केल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. तसेच आगामी काळात ही कारवाई कडक करण्यात येणार असल्याचे संकेत देखील उपायुक्त इथापे यांनी दिले आहेत. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसापूर्वी एक सर्क्युलर जारी करत वेळेचे पालन आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत महापालिकेत न आलेल्या कर्मचाऱ्यांना गेटवर अडवतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यासाठी सामान्य प्रशासन आणि सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. त्यानुसार याबाबत कर्मचाऱ्यांना दोन दिवसात खुलासा करावा लागणार आहे. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच गोष्टी कायदेशीर केल्या जाव्यात अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
महापालिकेतील बरेच कर्मचारी वेळेचे पालन करताना दिसत नाहीत. तसेच कार्यालयीन वेळेतही इतरत्र फिरताना आढळतात. याचा कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळातही कारवाई जारी राहणार आहे. सलग तीन वेळा वेळेचे पालन नाही केले तर एक रजा (CL) रद्द करण्यात येईल. असेच 7 वेळा झाल्यास दिवसाचा पगार कापला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करावे.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा