Special inspection campaign | PMC Pune | महापालिकेच्या कर विभागाची विशेष तपासणी मोहीम  | प्रत्येक पथकाला 200 मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट्य 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेच्या कर विभागाची विशेष तपासणी मोहीम

| प्रत्येक पथकाला 200 मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट्य

पुणे | महापालिकेचा कर आकारणी आणि संकलन विभाग हा पालिकेला महसूल मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावतो. म्हणून महापालिका आयुक्तांनी या विभागाकडे गंभीरपणे लक्ष दिले आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध विभागातील कर्मचारी घेतले आहेत. त्याची पथके तयार केली जातील. 7 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबवायची असून त्याचा अहवाल देखील तात्काळ द्यायचा आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
कामाचे स्वरूप / उद्दिष्टे :-

१) मिळकतींचा मंजूर भोगवट्यापेक्षा विनापरवाना वेगळा वापर सुरु असलेल्या मालमत्ता शोधणे,
२) बिगर निवासी मिळकतींच्या / इमारतींच्या सामासिक अंतरामध्ये / साईड मर्जीनमध्ये अनधिकृतपणे अतिक्रमण करून तसेच पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर सुरु असलेल्या मालमत्ता शोधणे, अशा मिळकतीवर त्या भागातील बिगर निवासी दराने तीन पटीने कर आकारणी झाली किंवा कसे, हे तपासणे.
३) इमारतींच्या छतावर ओपन टू स्काय टेरेसचा अनधिकृतरित्या बिगरनिवासी कारणासाठी वापर सुरु असलेल्या मालमत्ता शोधणे, त्यास त्या भागातील बिगर निवासी दराने तीनपट कर आकारणी झाली किंवा कसे, हे तपासणे.
४) मिळकतीच्या वापरात बदल केलेला आहे, मात्र त्याप्रमाणे कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधणे,
५) शहरामध्ये कर आकारणी करणे राहून गेलेल्या मोठ्या मालमत्ता शोधणे,
६) शहरातील रस्त्याच्या कडेच्या व हायवेच्या कडेच्या अतिक्रमण केलेल्या अनधिकृतपणे बिगरनिवासी कारणासाठी वापर सुरु असलेल्या मिळकती शोधून त्यास त्या भागातील बिगर निवासी दराने तीनपट कर आकारणी झाली किंवा कसे, हे तपासणे.
७) वरीलप्रमाणे नमूद बाबींच्या अनुषंगाने दि. ०७ ते १८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत क्षेत्रिय कार्यालय निहाय नियुक्त केलेल्या प्रत्येक पथकाने किमान २०० मिळकती शोधून काढून त्याची माहिती अहवालामध्ये सादर करावयची आहे.