State Election Commission | दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

State Election Commission | दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

 

State Election Commission – (The Karbhari News Service) –  जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

0000

PWD app | दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

पुणे |  दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये, यासाठी दोन्ही मतदारसंघात मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.

‘मतदान प्रक्रियेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदनाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्याकडून नमुना अर्ज १२-ड भरून घेण्यात येत आहेत.

मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. अंध व दृष्टी अधू असलेल्या मतदारांसाठी काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील मतपत्रिका देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींना सुलभतेने मतदान करता यावे आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे. दिव्यांग मतदारांना मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना ‘पीडब्ल्यूडी ॲप’ मोबाइलवर डाउनलोड करावे. या ॲपद्वारे आवश्यक मदतीचे स्वरूप नोंदवता येते. इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँन्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करता येते. या ॲपची नोंद करणाऱ्या नागरिकाला त्यांच्या मोबाइलवर मदतीची नोंद केल्यानंतर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल.

लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभागी व्हावे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील दिव्यांग मतदारांच्या बाबतीत अधिक जागरूक राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
000