Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र संपादकीय

Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

 

मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य” (Aashechya Gungit lataklele Tarunya) या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रमाणिकपणे तरुण-तरुणींच्या जगण्याचे भाव विश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या आक्राळ विक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकी नऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही ते आत्महत्या सारखा पर्याय जवळचा करतात. पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्यां उभा राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावं तर समाज मान्यता देत नाही, लग्न होत नाही म्हणून त्यांच्यांवर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरु होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचं खच्चीकरण होतं, काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमकं काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.

मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्था निर्माण केली पण त्या व्यवस्थेतून डावे -उजवे अशी सरळ सरळ विचारांची दरी उभा केली. चतुर भांडवलदारांनी आधुनिक जगात लाखो सामान्य नागरिकांना शासकीय व खाजगी पद, प्रतिष्ठा मिळवण्याची आणि श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवली. त्याचा परिणाम गांवागांवातील माणसांवर झाला. आणि ही माणसं आशेच्या गुंगीत जगू लागली. तर काही डाव्या – उजव्यांच्या पलीकडे जाऊन मानवी जगण्याकडे पाहू लागली. त्यांचे देखील अस्तित्व पणाला लागून लाखो तरुणांच्या जगण्याचे प्रश्न कसे आ वासून उभा राहिले. याचा धांडोळा घेणारी ही समकालीन साहित्यकृती आहे म्हणून महत्त्वाची ठरते.

कादंबरी : “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य”
लेखक : ज्ञानेश्वर जाधवर
प्रकाशक : पुस्तकविश्व्
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
मांडणी : सारद मजकूर

Koos | सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

| ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘कूस’ कादंबरीवरील परिसंवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

पुणे : “स्त्रीचे गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित विविध प्रकारचे शोषण ही वस्तुस्थिती आहे. शासनाची धोरणे चांगली असली तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लागतात. शासनाचे विविध विभाग आणि समाज यांच्यामधील मोठ्या अंतराचीही यात भर पडते. आयुक्तांपासून मंत्र्यापर्यंत सगळे बदलत असताना सरकारची संस्थात्मक स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी कूस ही कादंबरी उपयुक्त आहे. या संदर्भात सकारात्मक काम उभे करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सर्वोतोपरी मदत करू,” असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.
उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्ट्याच्या वतीने ‘कूस’ (Koos) या कादंबरीवर (Novel) आयोजित ‘कूस : स्त्रीच्या जगण्याचा व आरोग्याचा कथात्मक शोध’ या परिसंवादात (Seminar) डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे (Asaram Lomate) , ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. रणधीर शिंदे (Dr. Randhir Shinde) नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवती राणे, वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, केशायुर्वेदचे डॉ. हरीश पाटणकर, डॉ. रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर (Pradeep Champanerkar), कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Dnyaneshwar Jadhwar) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ही कादंबरी समाजाच्या तळागाळातील समूहाच्या दुःखमय अनुभवांची ज्वलंत कहाणी आहे. लेखकाने त्याच्या अनुभवांचे अत्यंत ताकदीनं केलेले चित्रण हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. यातील प्रमुख पात्र सुरेखा ही निघून जाते, असा कादंबरीचा शेवट आहे. ती सुरेखा कुठेही निघून गेली नाही तर ती स्त्रियांच्या चळवळीतच येईल यात शंका नाही. पण ही सुरेखा समाजात कुठेकुठे आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आहे.”
आसाराम लोमटे म्हणाले, “साखर कारखानदारीच्या क्षेत्रात तळाशी असलेल्या समाजसमूहांच्या वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आतापर्यंत विविध लेखकांनी लिहिलेल्या आहेत. कूस ही मानवी संवेदनेच्या पातळीवर नेणाऱ्या आश्वासक वर्तमान उभे करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ प्रश्न उभे करत नाही तर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा मार्गही दाखवते.” ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस या कादंबरीतूनही एक सकारात्मक वर्तमान हाती लागेल, अशी अपेक्षाही लोमटे यांनी व्यक्त केली.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, “फड, पिशवी आणि काजळी या त्रिदलाशी संबंधित ही कादंबरी आहे. बहूपीडित्वाचा परखड शोध या कादंबरीत घेतला गेला आहे. परिघावरच्या स्त्रियांच्या जगण्याचे अत्यंत रखरखीत यातनादायी वास्तव यात मांडले आहे. कादंबरीतील तपशीलांची शैली, लेखकाची आंतरिक गोवणूक, जगण्याचे आवाज, जिवंत माहोल या कलाकृतीच्या आशयात भर घालतात. भाषा, रितीरिवाजांचे एक सिंफनी यात असून शोधपत्रकारीतेच्या नजरेतून  समाज या समस्येकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, याचे चित्रण ही कादंबरी करते.”
डॉ. रेवती राणे म्हणाल्या, “विशेष करून चाळीशीच्या आतल्या स्त्रियांच्या गर्भपिशव्या काढण्याची कारणे आता द्यावी लागतील, असा निकाल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचाच अर्थ गर्भाशयात थोडी कुठे गाठ दिसली की पिशवी काढून टाकली जाते, असे आकडेवारी सांगते. याकडे गांभीर्याने पाहायला हवे. या विषयाकडे पाहण्याचे गांभीर्य कूस ही कादंबरी देते.” डॉ. राणे यांनी गर्भाशयाशी संबंधित विविध आजारांबद्दल विस्ताराने माहिती दिली. एकीकडे  गर्भपिशवी प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी होत आहेत त्यासोबतच आपण गर्भपिशवी वाचवण्यालाही महत्व दिले पाहिजे. आपण ‘बेटी बचाव’ ही घोषणा दिली तशी आता ‘थैली बचाव’ ही घोषणा द्यायची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “ही एका स्त्रीची प्रातिनिधिक कहाणी आहे. यात निरक्षरता, अनारोग्य, कुपोषण, लैंगिक शिक्षणाचा अभाव, स्त्री-पुरूष असमानता, व्यसनाधीनता, हुंडा, अज्ञान, अंधश्रद्धा याविषयी लेखकाने अत्यंत धाडसाने आणि निर्भीडपणे लेखकाने लिहिले आहे. आजच्या काळात मासिक पाळी विषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. पाळीकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्याची मानसिकता स्त्रीच्या मनावर तिच्या शालेय वयापासूनच बिंबवली जाते. हे बदलण्यासाठी स्त्री प्रश्नावर काम करणे गरजेचं आहे. स्त्रियांना माणूसपणाची जाणीव करून देण्यासाठी वंचित विकास संस्था खारीचा वाटा उचलेल.”
कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरीच्या निर्मितीविषयीचा प्रवास विस्ताराने मांडला. प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. उचित माध्यम समूहाचे संचालक जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.