Emergency works | प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी 1 कोटी | वित्तीय समितीत महापालिका आयुक्तांची मान्यता

Categories
Breaking News PMC social पुणे

प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी 1 कोटी

| वित्तीय समितीत महापालिका आयुक्तांची मान्यता

पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी 1 कोटी रूपयांचा खर्च करण्यास वित्तीय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. चारच्या प्रभागानुसार, हा निधी दिला जाणार असून या खर्चासाठी तब्बल 162 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. महापालिकेत प्रशासक नियुक्तीनंतर प्रभागांमध्ये विकासकामांसाठी नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून मिळाणारा निधी बंद झाल्याने तातडीच्या तसेच देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निधी नसल्याने प्रभागांमध्ये अनेक लहान मोठी कामे रखडली होती. तर ही कामे होत नसल्याने नागरिकांकडून थेट माजी नगरसेवकांनाच जाब विचारला जात होता. मात्र, आता ही कामे तातडीनं मार्गी लागणार आहेत.

महापालिकेची मुदत संपल्याने 15 मार्च 2022 पासून पालिकेवर प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महापालिका आयुक्तांनीच सादर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावनी सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करताना त्यात, नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी वॉर्डस्तरीय निधी तसेच “स’ यादीतून निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून अनेकदा या निधीतून नगरसेवकांनी सुचविलेली तातडीची कामे करतात. मात्र, या वर्षी महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने आयुक्तांनी “स’ यादीचा समावेश अंदाजपत्रकात न करता थेट क्षेत्रीय कार्यालयांनी सुचविलेली कामे घेतली. मात्र, त्यासाठी प्रस्तावित निधी कमी पडत असल्याने 1 एप्रील पासून जून अखेर पर्यंत अनेक कामांच्या निविदाच निघालेल्या नव्हत्या. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अनेक विकासकामे रखडली होती. दोन दिवसांपूर्वी वित्तीय समितीची बैठक सुरू असतानाच; शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी, त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना निधी नसल्याने, तसेच गावांमध्येही तातडीची कामे होत नाहीत तसेच नागरिक नगरसेवकांना दोष देतात म्हणून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना निधी द्यावा अशी मागणी केली. त्यावेळी लगेचच बैठकीतच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालिकेच्या पाचही परिमंडळ उपायुक्तांना लगेचच याबाबत विचारणा केली. त्यांच्याकडून या निधीची गरज असल्याचे सांगण्यात आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीनं प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने मागील प्रभाग रचने प्रमाणे प्रत्येक प्रभागास 1 कोटींचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यात, 25 लाखांचा निधी नागरिकांनी सुचविलेल्या अंदाजपत्रकातील तर 75 लाखांचा निधी अंदाजपत्रकात प्रस्तावित क्षेत्रीय कार्यालयाच्या कामातून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना तब्बल 162 कोटींचा निधी तातडीच्या कामांसाठी उपलब्ध होणार आहे.

समाविष्ट गावाला 30 लाखांचा निधी

दरम्यान याच वित्तीय समितीच्या बैठकीत नव्याने समाविष्ट झालेल्या प्रत्येक गावासाठीही तातडीच्या खर्चासाठी प्रत्येकी 30 लाख रूपयांच्या खर्चासही या वित्तीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेच्या 2022-23 च्या अंदाजपत्रकात या गावांच्या तातडीच्या कामांसाठी 30 कोटींचा निधी प्रस्तावित केलेला आहे. मात्र, तो कोणत्या कामासाठी आणि कोणत्या विभागाने वापरायचा हे निश्‍चित नव्हते. त्यामुळे, नव्याने समाविष्ट प्रत्येक गावाला 30 लाखांचा खर्च करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे, तसेच ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत संबधित गाव जोडून देण्यात आले आहे. त्या क्षेत्रीय कार्यालयाने नागरिकांची मागणी, तसेच गावातील तातडीनं सोडवायच्या समस्येसाठी हा खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.