NCP Vs Governor | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन

महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करण्यासाठीच केंद्र सरकारने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नेमणूक केली आहे का ? असा संशय येऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे श्रीमान कोश्यारी सातत्याने आपल्या विधानांतून महाराष्ट्र आणि मराठी जनतेचा अवमान करीत आहेत. थेट केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांना मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याची सुपारी दिली आहे का असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्यपालांच्या या बेताल वक्तव्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अलका चौकात निषेध करण्यात आला.

एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्राच्या जनतेला हिनवणारे विधान केले आहे. जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबईचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नांतूनच मुंबई आर्थिक राजधानी होण्याकडे पाऊल पडले. याखेरीज लक्षावधी मजूर, कामगार, कष्टकरी जनतेने मुंबई घडविली, वाढविली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे शिंपण करुन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आहे. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे त्या हुतात्म्यांच्या हौतात्म्यांचा अवमान तर आहेच याशिवाय मजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या श्रमाचा देखील राज्यपालांनी उपमर्द केला आहे.

प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करीत आले आहेत.यापुर्वीही त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अतिशय घाणेरड्या शब्दांत उल्लेख केला होता. कोश्यारी हे भाजपच्या मुशीत घडलेले नेते असल्याने ते आपल्या भाषणात जाणिवपूर्वक भाजपची स्क्रीप्ट वाचून दाखवितात की काय अशे वाटावे त्याप्रमाणे त्यांनी मुंबईविषयी प्रादेशिक वाद निर्माण करणारे वक्तव्य केले. अनावधानाने केलेले वक्तव्य समजू शकते पण कोश्यारी ‘हॅबीच्युअल ऑफेंडर’ असून त्यांना अशी विधाने करण्यात आनंद वाटतो. राज्यांराज्यांमधले संबंध हे सलोख्याचे असावेत यासाठी राज्यपाल व केंद्र सरकारने काम करणे आवश्यक असते. पण राज्यपाल वारंवार राज्यांराज्यांमधील संबंध बिघडविणारे विधान करीत असताना केंद्र सरकार आणि त्यांचा मातृपक्ष भाजपा देखील कसलाही हस्तक्षेप करीत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी,राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून महाराष्ट्राची माफी मागावी.महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी त्वरीत राजीनामा द्यावा किंवा केंद्र सरकारने त्यांना त्वरीत माघारी बोलावून घ्यावे. महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य असून पूर्वी पासूनच ह्या राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहत आले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वच घटकांचा समावेश आहे. छत्रपती शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या आजवरच्या राज्यपालांची परंपरा व इतिहाचे निरपेक्षपणे अवलोकन करण्याची गरज आहे.”

यावेळी राजीनामा द्या राजीनामा द्या राज्यपाल राजीनामा द्या, मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव,गो बॅक गो बॅक राज्यपाल गो बॅक अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर आंदोलना साठी प्रवक्ते प्रदीप देशमुख ,बाळासाहेब बोडके वनराज आंदेकर , गणेश नलावडे, संतोष नांगरे , काका चव्हाण ,उदय महाले , लक्ष्मी खत्री, , रूपाली पाटील , संतोष हात्ते,श्रुती गायकवाड, प्रदिप भोसले, कुलदीप शर्मा ,स्वप्नील थोरवे, राहुल पायगुडे, स्वप्नील खडके व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar : Governer : अजित पवारांनी पंतप्रधानासमोर राज्यपालांना खडे बोल सुनावले 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

अजित पवारांनी पंतप्रधानासमोर राज्यपालांना खडे बोल सुनावले

: उपमुख्यमंत्र्यांचे राज्य भरातून कौतुक

पुणे : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, मेट्रो उदघाटन, इ बस सेवा उदघाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य करणाऱ्यांना टोला लगावला आहे. महत्वाच्या पदांवरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाहीत असा ते यावेळी म्हणाले आहेत.

पवार म्हणाले, मला पंतप्रधान यांना लक्षात आणुन द्यायच आहे. की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेवरून त्यांचे कौतुक होत आहे.

मेट्रोच्या कामात कुठलंही राजकारण करू नका

काही नेत्याच्या हट्टापायी मेट्रो सुरू व्हायला १२ वर्ष गेली. पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. मेट्रो कशी सुरू करायची याला वेळ गेला,मात्र अखेर काम सुरु झालं आणि ती सुरु झाली. पिंपरी चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर,शिवाजीनगर ते खराडी या मार्ग सुरू करण्यास मदत घ्यावी. गडकरी साहेबांमुळे नागपूर लवकर सुरू झाली,त्यामुळे इतर ठिकाणी मदत द्यावी ही विनंती पवार यांनी केली आहे. कामात राजकारण न आणता ती पूर्ण करावीत. असही ते म्हणाले आहेत.

Agitation by pune NCP Against Governor : राज्यपालांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राज्यपालांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) केलेल्या भाषणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अवमान केला. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap)  यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात तीव्र निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले.

‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे. महान राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान करणे व ज्यांचे इतिहासात काडीचे योगदान नाही त्यांचे उदात्तीकरण करणे ही भाजप ची मोहीम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य हे काही अनावधानाने केलेलं नाही, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच तो भाग आहे. भगतसिंग कोश्यारींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. परंतु जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे या स्वराज्यात आहेत तोपर्यंत हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही असे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ठणकावून सांगितले. “छत्रपतींचा आशीर्वाद” म्हणत साळसूदपणाचा आव आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते वास्तवात किती टोकाचे शिवद्रोही आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होण्यापूर्वी आपण सगळेच शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहोत. हीच वेळ आहे सर्व मावळ्यांनी एकजूट होण्याची, भाजप व आरएसएस चे शिवद्रोही कारस्थान उधळून लावण्याची. यापुढे या मनुवादी विचारसरणीच्या विरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार आहे, मनुवादाचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही हा संदेश प्रशांत जगताप यांनी सर्व उपस्थितांना दिला. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशाराही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

:  दोन दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा

त्याचप्रमाणे हडपसर मधील प्रभाग क्रमांक २३ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत प्रस्ताव महापालिकेस दिला असून त्या प्रस्तावावर प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याच प्रमाणे महापौरांनी देखील विशेषाधिकारात स्वाक्षरी करण्यास नकार दिला. शिवाय हा विषय स्थायी व मुख्य सभेत घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेतून भारतीय जनता पार्टी चा खरा चेहरा उघड होत असून केवळ निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेत घेत आहे. या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी भाजपला असा सूचक इशारा दिला की, जर दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे ,विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ ,नगरसेवक योगेश ससाने ,सचिन दोडके ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,गणेश नलावडे,दिपक कामठे,दिपक जगताप,निलेश वरें,अमर तुपे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

Symbiosis : Governor : सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

Categories
Education पुणे महाराष्ट्र

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे  – विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संशोधनासोबत सृजनशीलतेलाही महत्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व असलेल्या युगात मूल्याची जाण ठेवणेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आणि मूल्यांच्या विकासावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देताना सोबत इंग्रजीचे शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होईल. स्नातकांनी त्यासाठी प्रादेशिक भाषेत पुस्तके लिहिण्याचे काम केल्यास ती समाजाची मोठी सेवा ठरेल.

सिम्बॉयसिस विद्यापीठ विश्वबंधुत्वाचे प्रतीक आहे. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपण जागतिक पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर प्रगतीची झेप घेताना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गावाच्या प्रगतिकडेही लक्ष द्यावे. जगाच्या कल्याणाचा विचार करताना देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनात अधीक चांगले यश संपादन करता येईल, असे ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करावा. विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी या आव्हानांवर मात करीत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

डॉ.मुजुमदार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला भारतीय चेहरा मिळाला आहे. भारतीय ज्ञानप्रवाहाचा शिक्षणात समावेश करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावनाही त्यात समाविष्ट आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठाने या धोरणानुसार वाटचाल सुरू ठेवली आहे. साहचर्य आणि स्वावलंबन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. सर्व भेद बाजूला सारून वैश्विक भावनेचा संदेश देताना पर्यावरण संवर्धनासारख्या महत्वाच्या विषयावरही विद्यापीठाने लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

येरवडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.