Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान 

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचला देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखीमार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फूलून गेला आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत.

संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले, की यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम सोमवारी दुपारी अडीचला मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरु होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, पिंपरी येथील कुशल वर्मा बंधूकडून रथाला पॅालीश करण्यात आलेली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येऊन गेल्याने विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. पालखीमार्ग, वैकुंठस्थान मंदिराकडे जाणारा मार्ग नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणी मारून स्वच्छ धुण्यात आले. नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण आदी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे.

…असा होईल सोहळा

  • पहाटे साडेचार – देऊळवाड्यात काकडा
  • पहाटे पाच – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल.
  • साडेपाच – संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
  • सहा – वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
  • सकाळी सात – पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
  • सकाळी नऊ ते ११ – इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन
  • सकाळी १० ते १२ – रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन.
  • दुपारी अडीचला – इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणण्यात येतील. अडीचला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
  • सायंकाळी पाच – पालखी प्रदक्षिणा होईल.
  • सायंकाळी साडेसहा – मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळा इनामदार वाड्याकडे मार्गस्थ. इनामदारवाड्यात पालखी सोहळा मुक्कामी असेल.

PMPML Bus | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे

 पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे.

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 18/06/2022 पासून दिनांक 22/06/2022 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण 130 बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक 21/06/2022 रोजी रात्रौ 12:00 वा. पर्यंत आळंदी
करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 22 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 10 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.

दिनांक 22/06/2022 रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 03:00 वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी 05:30 वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्याm सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40 आवश्यक) देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक 24/06/2022 रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी 12:00 ते 1:00 दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.

तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Palkhi ceremony | Ajit Pawar | पालखी सोहळ्यात लसीकरणाची सुविधा करा | अजित पवार | पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

पालखी सोहळ्यात लसीकरणाची सुविधा करा | अजित पवार

| पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

पुणे | पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.

पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत, सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे , त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्यादृष्टेने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षीत करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त  राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी वारी ॲपचे उद्घाटन

बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्यारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे. पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील नियोजन

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. नीरा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. पाडेगाव घाटाची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील नियोजन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण १ हजार अधिकारी आणि २५ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी कायमस्वरूपी २४ हजार आहेत. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पत्रा शेड तयार करण्यात आले आहे. पुलांचे काम सोडून इतर कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होतील असे  शंभरकर यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते