PCPNDT | Maharashtra News | राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी आता १०४ टोल फ्री हेल्पलाईन

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

PCPNDT | Maharashtra News | राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी आता १०४ टोल फ्री हेल्पलाईन

PCPNDT | Maharashtra News | पुणे | सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Health Minister Dr Tanaji Sawant) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) वाढविण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी आणि विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच शंकेचे निरसन करण्यासाठी १०४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू करण्यात आली आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. या हेल्पलाईनद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यंत १ हजार ६९ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून १ हजार ६४ तक्रारींचे निवारण राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

पीसीपीएनडीटी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ हा पूर्वी कार्यान्वित होता परंतू आता हा क्रमांक आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १०४ मध्ये २२ फेब्रुवारी २०२४ रोजीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. ही सेवा जनतेसाठी २४ तास पूर्ण वेळ उपलब्ध करण्यात आली आहे. आता हे दोन्हीं हेल्पलाईन क्रमांक पीसीपीएनडीटी तक्रार नोंदविण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहेत.

या क्रमांकाद्वारे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीची कक्षातील कार्यरत अधिकारी-कर्मचारी नोंद घेवून संबंधित समुचित प्राधिकारी (जिल्हा शल्य चिकित्सक), वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका (शहरी विभागाकरिता) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे पुढील कार्यवाहीकरिता ईमेलद्वारे दररोज पाठविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १०४ येथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या मार्फत पीसीपीएनडीटी तक्रारींच्या स्वरुपाविषयी २३ फेब्रुवारी रोजी उपसंचालक आरोग्य सेवा (कु.क) डॉ. रेखा गायकवाड आणि सहाय्यक संचालक डॉ. राजश्री ढवळे यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.

दोन्ही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर कोणीही तक्रार दिल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्याची इच्छा असल्यास ते नावदेखील नोंदवू शकतील व पीसीपीएनडीटी कायद्या अतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर त्यावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यास तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपये देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु करण्यासाठीची कार्यवाही सुरु असून ते लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहितीही आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

Pune : Sex Ratio : पुढारलेल्या पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण!   

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुढारलेल्या पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण!   

: शहरात 1 हजार मुलांमागे फक्त 900 मुली 

 

पुणे : एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींचे प्रमाण राज्यात सुधारले असले, तरी पुणे शहर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढारलेल्या पुण्यात ही स्थिती व्हावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण हे 900 आहे. मागील वर्षी हे प्रमाण 946 होते. मागील काही वर्षात महापालिकेने चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण झाली आहे.

 

: जनजागृतीत महापालिका कमी पडली 

 
एक हजार मुलांच्या जन्मामागेच मुलींच्या जन्माचे प्रमाण काढण्यात येते. पुणे महापालिकेकडून अथवा कोणत्याही शहर, जिल्ह्यातून मुलींच्या जन्माची आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यावरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जन्म विभागाकडे दैनंदिन मुला मुलींच्या जन्माची नोंदणी केली जाते. त्यातून संकलित माहितीच्या आधारे हे प्रमाण काढले जाते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुणे शहर आणि महापालिका राज्यात वरच्या स्थानावर होती. याबाबत महापालिकेचे राज्य सरकार कडून कौतुक देखील केले जायचे. महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना राबवून आणि जनजागृती करून हे प्रमाण वाढवले गेले होते. मात्र 2021 सालात हे प्रमाण चांगलेच घसरले आहे. मुलींचे स्वागत करण्यात पुढारलेले पुणे उणे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान यावर्षी संपूर्ण लक्ष कोविड कडेच असल्याने महापालिका जनजागृती करण्यात कमी पडली, असे मानले जात आहे.
 

: 2020 ला सेक्स रेशो 946 

दरम्यान, ‘ 2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली आहे. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 आहे. असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

: लिंग गुणोत्तर (sex Ratio) प्रमाण 

 
वर्ष             मुले          मुली       रेशो 
 
2010         26560      23357    879
2011        27589       24396   884
2012        29126       27212   934
2013        28772      26831    933
2014        27851       26098  937
2019        27407     25262.  922
2020.      25967.    24577.   946
2021.      20273.    18259.   900
(ऑक्टोबर पर्यंत)