Goa State | पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ!

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे
Spread the love

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ!

|  “स्वच्छोत्सव २०२३” अभियान अंतर्गत गोवा शहरातील महिला स्वच्छतादूत व समन्वयक यांची पुणे शहरातील स्वच्छता यात्रा

जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याला (Goa state) स्वच्छते बाबत पुणे महापालिकेच्या प्रकल्पांची (PMC Pune Garbage project) भुरळ पडली आहे. गोव्यातील नगरपालिका स्वछतेसाठी पुणे महापालिकेचा आदर्श घेऊन इथले प्रकल्प तिथे राबवणार आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनाद्वारे ७ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत ‘स्वच्छोत्सव २०२३’ हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत स्वच्छता यात्रा ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छतेमधील महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वृद्धिंगत करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या स्वच्छता यात्रे अंतर्गत गोवा शहरातील एकूण १२ महिला स्वच्छता दूत आणि २ समन्वयक यांनी पुणे शहरास दिनांक २५ व २६ मार्च २०२३ या कालावधीमध्ये भेट दिली. या भेटी दरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापनातील विविध प्रकल्प आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Deputy commissioner Aasha Raut) यांनी दिली.
२५/०३/२०२३ रोजी सर्व स्वच्छता दूत यांनी पुणे महानगरपालिका व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांचेमार्फत सुरु असलेल्या शहरातील दारोदारी वर्गीकृत कचरा संकलनाची पहाणी केली. यासाठी तावरे कॉलनी येथे भेट देण्यात आली. स्वच्छ संस्थेच्या विद्या नाईकनवरे यांनी कचरा वेचकांची स्वावलंबी संस्था असलेल्या स्वच्छ संस्थेचा पूर्ण प्रवास कथन केला. यानंतर अरण्येश्वर येथील फीडर पॉइंटवरील दुय्यम कचरा संकलन प्रणालीचे निरीक्षण व EPR अंतर्गत सुरु असलेल्या बहुस्तरीय प्लास्टिक संकलन प्रणालीचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर कचरा वेचक सदस्यांनी ऋतुरंग सोसायटी येथे इन-सीटू ऑरगॅनिक कंपोस्टिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कात्रज येथील सुपर्णा मंगल कार्यालयातील मॉड्यूलर बायोमिथनेशन युनिट पाहण्यात आले. कचरा वेचकांमार्फत सुक्या कच-यातून विविध प्रकारचे भंगार कसे काढले जाते व त्यातून होणारे पुर्नचक्रीकरण याबाबत माहिती जाणून घेतली.

कात्रज K-3 व K-4 बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली. याठिकाणी उपस्थित सर्व महिला स्वच्छतादूतांशी संवाद साधला. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ज्यूट बॅग, पुणे शहराचे वैशिष्ट सांगणारे कॅलेंडर व इतर काही पर्यावरणपूरक भेटवस्तू देऊन या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेअंतर्गत चालणा-या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या फिल्स, गाणी देखील दाखविण्यात आले. उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत महिलांच्या सहभागातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.

तद्नंतर कचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ या संस्थेला भेट देण्यात आली. डॉ. राजेश मणेरीकर यांनी संस्थेद्वारे चालणाऱ्या कचरा व्यवस्थापनाशी निगडीत सर्व प्रकल्पांची थोडक्यात माहिती दिली.
पुणे महानगरपालिका आणि आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डोअर टू डोअर ई-कचरा संकलन प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट ठेवून राबविला जाणारा फॅब्रिक अप-सायकलिंग प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेतील शिवणकामाचा पूर्ण सेट अप आलेल्या सर्व महिला सदस्यांनी पहिला. त्याचबरोबर येथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. स्नेहल वाघोले यांनी या प्रकल्पांतर्गत बनविल्या जाणाऱ्या विविध वस्तू दाखविल्या आणि प्रत्येक वस्तूची माहिती दिली.
यानंतर सर्व महिला बचतगट प्रतिनिधींचे लक्ष्मीनगर, कोथरूड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कोथरूड बावधन प्रभागांतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर वसाहतीत चालणाऱ्या विविध सामाजिक कार्याचा आढावा जनवानी संस्थेचे प्रतिनिधी क्षीरसागर यांनी मांडला
२०१८ मध्ये चालू केलेले काम कोव्हीड नंतर देखील चालू असून येथे कचरा वर्गीकरण व संकलनाचे काम यशस्वीरीत्या चालू असल्याचे दाखले त्यांनी महिलांना दिले तसेच हे काम गोव्यात घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
थंब क्रिएटिव्ह संस्थेचे प्रशांत अनारसे यांनी महिलांनी निर्माल्यापासून तयार केलेल्या अगरबत्त्या कशा त्यांना उपजिवीका निर्माण करत आहेत याचे विवेचन केले. त्यांनी महिलांना प्रत्येक पान व फुलापासून सुंदर वस्तू निर्माण करण्याचे आवाहन केले. हर्षदीप फाउंडेशनच्या ज्योती भेंडाळे यांनी टाकाऊ कापडण्यापासून महिलांनी तयार केलेल्या सुंदर पिशव्या, गुढी व पर्स यांचे उदाहरण दिले यावेळी संस्थेमधून यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे शहरातील विविध महिला बचत गट व संस्थांनी देखील आपण करत असलेल्या कामाची माहिती आलेल्या पाहुण्यांना दिली व सर्व महिला एक आहेत असा संदेश देखील दिला. यावेळी संदीप क्षीरसागर, संपत खैरे, वैजनाथ गायकवाड, समीर गायकवाड, युवराज चाबुकस्वार यांसह जनवानी, हर्षदीप, सेवा सहयोग, पुणे महानगपालिका व कमिन्स इंडिया
फाउंडेशनचे पदाधिकारी व लक्ष्मीनगर येथील नागरिक उपस्थित होते. यानंतर वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत मल्टी स्पाईस हॉटेल याठिकाणी शहरातील विविध नागरिकांनी पुर्नवापर व पुर्नचक्रिकरण करून बनवलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तुंच्या प्रदर्शनाची पहाणी करण्यात आली.