Marathi Language Officer : मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”! 

Categories
Breaking News cultural PMC पुणे
Spread the love

मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”!

: सरकारच्या भाषा समितीचा दौरा पाहून तात्काळ नेमला मराठी भाषा अधिकारी

पुणे :  पुणे महानगरपालिकेचे कार्यालयीन कामकाज हे प्राधान्याने मराठी या भाषेत चालते. तसेच राज्य सरकारने देखील मराठी भाषेला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. मात्र मराठी भाषेच्या वापर आणि प्रसाराबाबत महापालिका तेवढी गंभीर दिसून येत नाही. भाषेच्या संवर्धनाबाबत महापालिकेने मराठी भाषा अधिकारीच अजूनपर्यंत नेमला नव्हता. मात्र आता महापालिकेला उशिरा जाग आली आहे. राज्य विधान मंडळाच्या मराठी भाषा समितीचा अभ्यास दौरा महापालिकेत येत आहे. समितीने महापालिकेला विचारणा केली आहे कि आपल्याकडे मराठी भाषा अधिकारी नेमला आहे का? समितीच्या विचारणे नंतर महापालिकेने तात्काळ मराठी भाषा अधिकारी नेमला आहे. याची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या या कारभाराला उशिरा सुचलेले शहाणपण असेच म्हटले जात आहे.

पुणे महानगरपालिकेत खात्यांतर्गत पत्रव्यवहार, नागरिकांसोबतचा पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज हे मुख्यत: मराठी भाषेतच आहे. पुणे महानगरपालिकेत मराठी भाषेचे जतन, प्रचार व प्रसार यासाठी उपक्रम/कार्यक्रम राबविणे, मराठी भाषा संवर्धनासाठी महानगरपालिका स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारने देखील आदेश पारित केले होते. त्यानुसार या कामासाठी महापालिकेकडे मराठी भाषा अधिकारी असणे आवश्यक होते. मात्र महापालिकेत असा अधिकारीच नेमण्यात आलेला नव्हता. मात्र आता महापालिकेला उशिरा जाग आली आहे. पुणे महापालिका कार्यालयामधील कामकाजामध्ये करण्यात येणारा मराठी भाषेचा वापर, मराठी भाषेचा प्रसार व विकास करण्याकरिता महापालिका स्तरावरून राबवण्यात येणारे उपक्रम तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना याबाबत राज्य विधान मंडळाच्या मराठी भाषा समितीचा दौरा महापालिकेत येत आहे. त्या अनुषंगाने समितीने विचारणा केली आहे कि महापालिकेत मराठी भाषा अधिकारी आहे का? मात्र असा अधिकारी महापालिकेने नियुक्त केलेला नाही. त्यानंतर तात्काळ महापालिकेने मराठी भाषा अधिकारी नियुक्त केला आहे. सद्य स्थितीत महापालिकेत मराठी भाषा संवर्धन समिती अस्तित्वात आहे. यानुसार थोडे फार कामकाज चालते. मात्र स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आलेला नव्हता. तो आता नेमण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

 आशा राऊत, उप आयुक्त (मध्यवर्ती भांडार विभाग) यांची अधिनियमातील तरतुदीनुसार ‘मराठी भाषा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(अ) कार्यालयामध्ये शासकीय प्रयोजनांसाठी मराठीचा वापर करत नसल्यासंबंधीची व या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी होत नसल्यासंबंधीची गाऱ्हाणी  किंवा तक्रारी स्विकारणे व त्यांचे प्रभावी निवारण करण्यासाठी सहाय्य करणे
(ब) या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींच्या प्रभावीअंमलबजावणीची सुनिश्चिती करण्यासाठी उपाययोजना करणे. या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान मराठी भाषेच्या उपाय योजनेच्या आढावा घेण्यासाठी सोमवारी खाते प्रमुखांची एक बैठक बोलावली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

Leave a Reply