Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती

| पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

लवकरच जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांनी दिले. तसेच पाणी वापर संस्थांची ५० टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना श्री. पाटील यांनी केल्या.(Recruitment of 500 posts of Junior Engineers in Water Resources Department)

| नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

 

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Canal advisory committee)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जावे यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. (Neera canal)

 

नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने

नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (Neera left canal)

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Chaskaman dam)

प्रारंभी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. एल निनो सक्रिय होण्याची शक्यता, आयओडी, युरेशियावरील बर्फाचे आवरण यांचा पावसावर होऊ शकणार परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके नीरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.