Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी

| हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट

 

Kasba Constituency Civic Issues | गेल्या चार महिन्यांपासून कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Constituency)  विविध प्रभागांमध्ये सुरू केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांच्या (BJP Offices) माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पेठ विभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा,   जुन्या वाड्यातील ड्रेनेज लाईन, मोठ्या पावसामध्ये नागझरी लगत असणाऱ्या वसाहती मध्ये पावसाळ्यात होणाऱ्या पाणी समस्यांच्या दृष्टीने उपाययोजना करणे,  पेठांमधील धोकादायक वाढलेली झाडे व फांद्यांची छाटणी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे अशा समस्यांचा समावेश आहे. याचे निवारण करण्याबाबतचे निवेदन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar)  यांना कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत  रासने (Hemant Rasane) यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (Kasba Constituency Civic Issues)

या समस्यांमध्ये महापालिकेच्या विविध विभागातील पुढील तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे.

1.पाणीपुरवठा
कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांची दखल घेऊन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. (Pune Municipal Corporation)

2. रस्ते विकास
विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे, डांबरीकरण करण्याची गरज आहे. (PMC Pune)

3. पार्किंग
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पार्किंगचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. तसेच पार्किंगच्या पट्ट्याही अस्पष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

4. पदपथ
कसबा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदपथांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तसेच पदपथ नादुरुस्त झालेले आहेत. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा अस्पष्ट झाल्या आहेत. मतदारसंघातील पदपथ दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल.

5. ड्रेनेज लाईन आणि पावसाळी गटारे

मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत .चेंबर खचलेली आहेत. ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच पावसाळी गटार लाईन मधील राडाराडा काढून ते प्रवाही करण्याची गरज आहे.

6. सुलभ शौचालयांची दुरुस्ती
कसबा विधानसभा मतदारसंघातील वस्ती विभाग आणि जुन्या वाड्यांच्या परिसरामध्ये सुलभ शौचालये दुरावस्था झालेली आहे. दरवाजे बदलणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात.

7. वृक्ष छाटणी
पावसाळा अर्ध्यावर आला तरी देखील मतदारसंघातील धोकादायक पद्धतीने वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कृपया तातडीने वृक्षांची छाटणी करावी

8. पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा
मतदारसंघात विविध ठिकाणी पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी नवीन उभारण्याची गरज आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही त्यासाठी उपाय योजना कराव्यात.

विषयांची तातडीने नोंद घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी महापालिका आयुक्तांना यावेळी करण्यात आली. (PMC Pune News)


News Title | Request to the Municipal Commissioner to solve the civil problems in Kasba Constituency