Shailesh Tilak | शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक यांनी घेतली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाच्या नेतृत्वाला लवकरच कळविण्यात येईल, असे शैलेश यांनी स्पष्ट केले असून, त्यांच्या जाहीर भूमिकेमुळे भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (kasba constituency byelections)

पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती.

‘मुक्ता यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी भावना आहे. मीही उमेदवारीसाठी इच्छुक असून चिरंजीव कुणाल याचेही वेगळ्या माध्यमातून जनसंपर्काचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र, ही भावना लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे शैलेश यांनी स्पष्ट केले. उमेदवारीबाबत शैलेश यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतल्याने पक्षाचे नेतृत्व यासंदर्भात कोणता निर्णय घेतात, याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. (shailesh Tilak)

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे, पोटनिवडणूक बिनविरोध करायची की, कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकमताने घेतला जाणार आहे. (Mukta Tilak)