Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

Aba Bagul Pune | नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका! | जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवा

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune | नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका! | जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवा

| कॉंग्रेस च्या आबा बागुल यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी

Pune – (The Karbhari News Service) – Aba Bagul Pune | लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी जाहीर सभा घ्या. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. अशी मागणी कॉंग्रेस नेते आबा बागुल यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका. तसे झाले तर निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च लागेल. असा टोला देखील बागुल यांनी लगावला आहे.

बागुल यांनी पटोले यांना लिहिलेल्या पत्रानुसार तुम्ही आम्हाला कधीही सांगा, कुठे सभा घ्यायची तेही सांगा. ७० हजार ते १ लाखापेक्षा अधिक पुणेकर या सभेला एक हजार टक्के उपस्थित राहतील याची मी ग्वाही देतो. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा.

मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे.

बागुल यांनी पुढे म्हटले आहे कि, मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचा कौल घ्या,जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल.

आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेऊन जाहीर सभेच्या आयोजनासाठी निर्देश द्या आणि त्यानुसारच पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा ही विनंती. जर तेच ‘यशस्वी कलाकार’ पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च लागेल. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, त्यानुसारच उमेदवार ठरवावा. असे बागुल यांनी म्हटले आहे.