Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन

|पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

काँग्रेस नेते  खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन आज करण्यात आले. पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते. आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले. महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी असलेले, तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावून, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन केले गेले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, सुजित यादव, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, विजय खळदकर, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, ऋषीकेश बालगुडे, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.