Chandrakant Patil Vs Shivsena : भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा : किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार!

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

: किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

पुणे : किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.‌ पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माननीय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याहीक्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाटील पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आता परमवीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्या ईडीला दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?” असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Mohan Joshi : अमित शहा यांची पुणे भेट म्हणजे भाजपच्या पराभवाची कबुली : माजी आमदार मोहन जोशी यांची टीका 

Categories
Breaking News Political पुणे

अमित शहा यांची पुणे भेट म्हणजे भाजपच्या पराभवाची कबुली

– माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे – राष्ट्रीय राजकारणातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात बोलवावे लागले. ही भाजपच्या महापालिकेच्या येत्या निवडणुकीतील पराभवाची कबुलीच आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

गेल्या पाच वर्षात भाजप, महापालिकेत एकही भरीव काम उभे करु शकलेले नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी अमित शहा यांना भाजप नेते बोलावू शकलेले नाहीत. पुणेकरांनी भाजपचा हा सगळा कारभार पाहिलेला आहे, त्यामुळे अमित शहा येवोत अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी येवोत भाजपचा महापालिका निवडणुकीतील पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपने शहरात मोठमोठे फलक लावले. त्यावर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचे मोठमोठे फोटो होते. पण, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्या फलकांवर नव्हते. राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करुन घ्यावयाचा. ‘ ‘मुँह में राम, बगल में छुरी’ ही भाजपची नीती पुणेकरांना पहायला मिळाली, अशीही टीका मोहन जोशी यांनी केली.

वाढत्या महागाईसंदर्भात ‘अमित शहा जवाब दो’ अशी हॅशटॅग मोहीम सोशल मिडियावर काँग्रेस पक्षाने आज (रविवार) पासून चालू केली आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. या संदर्भात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. इंधन, धान्य, खाद्यतेल, भाज्या यांचे भाव वाढत आहेत. घरगुती गॅसची किंमत एक हजार रुपये झाल्याने महिलांना पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आली आहे. महागाई वाढत असताना अमित शहा अथवा भाजपचे कोणतेही नेते त्याविषयी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मिडियावर ‘अमित शहा जवाब दो’ ही हॅशटॅग मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 

Deepali Dhumal : PMC : महापालिकेच्या चांगल्या कार्यक्रमापासून दूर ठेवले : सत्ताधाऱ्यांचे गलिच्छ राजकारण  : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

सत्ताधाऱ्यांचे गलिच्छ राजकारण

: विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप

पुणे : महापालिकेच्या  वतीने महानगरपालिका आवारात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाचे भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. परंतु पास मात्र आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजप ने केलेले गलिच्छ राजकारण आहे. असा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

: भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला

धुमाळ म्हणाल्या आधीच  या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान केले आहे. आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले आहे. कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधी ची सुचना दोन तिन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो. याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक केले कृत्य आहे. या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. महापालिकेच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला ईच्छा असताना हजर राहता आले नाही. भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला. असेही धुमाळ म्हणाल्या.

NCP : Prashant Jagtap : Agitation : अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन : महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन

: महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

 

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला “किरकोळ” वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत. यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते. आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडनवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी भावना यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप,महिला शहराध्यक्ष सौ.मृणालिनीताई वाणी,प्रदेश प्रतिनिधी श्री.प्रदीप देशमुख,सौ.रुपालीताई ठोंबरे पाटील,राकेश कामठे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख,मनाली भिल्लारे,महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.