Ganesh Jayanti | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Categories
Breaking News cultural social पुणे

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

| नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे| माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे.

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग : या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.

स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग: ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत असून ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.

बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Traffic changes | १ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

Categories
Breaking News cultural social पुणे

१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

पुणे | नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

१ जानेवारी रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.

त्यानुसार पूरम चौकातून बाजीराव रोडने शनिवार वाडा हा मार्ग बंद करण्यात येणार असून नागरिकांनी त्याऐवजी पूरम चौकातून टिळक मार्गाने अलका टॉकीज चौकातून इच्छितस्थळी जाणाचा पर्याय अवलंबवावा. अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक हा मार्ग बंद असणार आहे, त्याऐवजी नागरिकांनी आप्पा बळवंत चौक- बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा व पुढे इच्छीतस्थळी जावे.

स.गो.बर्वे चौक ते पुणे महानगरपालिका भवन तसेच शनिवारवाडा हा रस्ता बंद राहील. त्याऐवजी नागरिकांनी स.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोडमार्गे झाशीची राणी चौकातून इच्छितस्थळी जावे. गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक हा रस्ता देखील बंद असणार असून त्याऐवजी गाडगीळ पुतळा-डावीकडे वळून कुंभारवाडा किंवा सूर्या हॉस्पिटल समोरून इच्छितस्थळी जाता येईल, असे पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati | १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर 

Categories
Breaking News cultural पुणे

१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर

मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर यंदाच्या प्रथमच विसर्जनासाठी उशीर झाला. मंडळाच्या १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास दुसऱ्या दिवशीचे सकाळचे ११ वाजले.

दरवर्षी सकाळी साडेसात वाजता होणारे विसर्जन या वेळेस सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी झाले. मिरवणुकीत नियोजनाचा अभाव असल्याने अनेक मंडळे पुढे सरकत नव्हते. परिणामी श्रीमंत मानाचा दगडूशेठला बेलबाग चौकात येण्यासच दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. शनिवारी सकाळी साडेसात वाजता दगडूशेठ गणपती बेलबाग चौकात होता. त्यानंतर तो अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

याबाबत महेश सूर्यवंशी म्हणाले, “पोलीस प्रशासनासोबत अनेक गणेश मंडळांच्या बैठका झालेल्या आहेत. आम्ही आमचा अनुभव त्यांना सांगितलेला आहे, त्यांनी देखील नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही कमतरता नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या दिसत आहेत, त्यामुळेच हा विलंब झाल्याचे दिसून येत आहे.”

याशिवाय, “यंदाचा गणेशोत्सव हा करोनाच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर झालेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आणि मंडळांमध्ये दिसून आला. नऊ दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात आणि भक्तीभावात व श्रद्धेने पार पडले. आजचा जो विसर्जनचा दिवस आहे, त्या विसर्जनास आम्हाला विलंब झालेला आहे. तरीदेखील गणपती बाप्पांनी भक्तांना जो दर्शनाचा लाभ दिलेला आहे. बाप्पांचा रथ जसजसा पुढे जात होता, तसे भाविक अजिबात जागचे हलले नाहीत. किंबहुना संख्या अधिकच वाढत होती. भाविका आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर होते. खूप मोठ्याप्रमाणावर भाविकांनी गर्दी केली. ” असंही सूर्यवंशी म्हणाले.

“परंतु , १३० वर्षांच्या दगडूशेठ गणपतीच्या इतिहासात सर्वात विलंब झालेली ही विसर्जन मिरवणवुकीची वेळ आहे आणि याची खंत निश्चितच वाटते. काही त्रुटी नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या आहेत. जबाबदारी ही सामूहिक असते, परंतु यामध्ये संवादाचा अभाव दिसतो. अनुभवाची थोडी कमतरता वाटते, कारण दोन वर्षांच्या कालखंडानंतर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोडी कमतरता जाणवली. त्यामुळे कदाचित पोलीस प्रशासन नेमकं नियोजन करू शकलं नसेल. ” अशा शब्दांत सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवले.

याचबरोबर, “शेवटी हा गणपती बाप्पांचा अत्यंत वैभवशाली विसर्जन मिरवणूक सोहळा आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेलं असतं. आपल्या भारतीय संस्कृतीचा हा खऱ्या अर्थाने गौरव ठरतो. जरी विलंब झाला तरी भाविक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतूर होते. यावरून उशीर झाला ही गोष्ट भाविकांना अजिबात खटकलेली नाही. परंतु व्यवस्थेला निश्चितपणे पुढील वर्षी योग्य नियोजनाचा विचार करावा लागेल. ” असंही देखील महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं.

shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन

शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांच्या २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.

त्या म्हणाल्या, ” शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष आपले काम आणि कार्य जोरदारपणे सुरू ठेवत आहे.”

आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी श्री गणेशांना उद्धवजीच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलोंचा मोदक डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी श्रींना अभिषेक केला आणि श्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा संघटक
राम गायकवाड, नितिन चांदेरे बाजार समिती सदस्य, उप शहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, संतोष गोपाळ, म्हाळुंगे गावचे युवा सरपंच मयुर भांडे, संजय गवळी, अविनाश मरळ, शादाब मुलाणी, स्वप्नील कुंजीर, धनंजय चौधरी, युवराज शिंगाडे, राजू विटकर, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, श्रुती नाझीरकर, स्वाती कथलकर, कविता आंब्रे, ज्योती चांदेरे, विद्या होडे, शर्मिला येवले, अनिता परदेशी, निकीता मारटकर, गायत्री गरुड आदी उपस्थित होते.

Pune NCP : Sharad Pawar : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक  : पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती : Video पहा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक

: पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चोहोबाजूंनी सदिच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रार्थना म्हणून पुण्याचे दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात आरती करून शरदचंद्रजी पवार यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

 

Amit Shah : Dagadusheth Halwai Ganpati : गृहमंत्री अमित शाह सुमारे ५ वर्षानंतर घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे

केंद्रीय मंत्री अमित शाह सुमारे ५ वर्षानंतर घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता पुणेकरांचे श्रध्दास्थान असणार्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी कळविली आहे.

रासने म्हणाले, पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडक्‍र यांच्या पुतळ्याचे अनावरण, महापालिका हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि शहर भाजपच्या बूथ समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांसाठी शाह पुणे भेटीवर येत असून, त्या वेळी ते गणपतीचे दर्शन घेणार आहेत. या पूर्वी दोन वेळा ते सपत्नीक दर्शनाला आले आहेत. पाच वर्षांपूर्वी ५ जून २०१६ रोजी पुणे दौर्यादरम्यान त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले होते.

Ashok Godse : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे संचालकही होते. गेल्या काही दिवसांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर दोन आठवड्यांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरवात केली. १९९६ पासून ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे संचालक होते. २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१० पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. दरवर्षी होणाऱ्या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.